कॉलेज बंद करण्याचा घाट; 29 विद्यार्थ्यांचे भविष्य ‘फ्रीज’, विद्या प्रतिष्ठानचा मनमानी कारभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घ्यायचा आणि त्याची झळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याला बसू द्यायची, असा प्रकार विद्या प्रतिष्ठान संचालित शिक्षणशास्त्र्ा महाविद्यालयाच्या ‘एम.एड.’ प्रवेशप्रक्रियेत समोर आला आहे. सीईटी सेलमार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू असताना महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वेळेत सीईटी सेलला देण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाचा पर्याय निवडला. यातील 29 विद्यार्थ्यांना याच महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश ‘ऑटो-प्रीज’ झाले. आता मात्र महाविद्यालयाकडूनच प्रवेश देण्यास असमर्थता व्यक्त करण्यात येत असल्याने या 29 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

सीईटीच्या अधिकृत प्रक्रियेत महाविद्यालयाचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तो निवडला. प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवेश ‘ऑटो-प्रीज’ झाला. मात्र, त्याच वेळी महाविद्यालय बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पुढे आले. महाविद्यालयाला प्रवेश देणे शक्य नव्हते तर सीईटीच्या पर्यायांमध्ये त्याचा समावेश का ठेवण्यात आला? सीईटी सेलला वेळेत माहिती का देण्यात आली नाही? विद्यार्थ्यांनी पर्याय भरल्यानंतर आणि प्रवेश निश्चित झाल्यानंतरच महाविद्यालय प्रशासनाला जाग का आली? या प्रश्नांची उत्तरे आता संबंधितांनी देणे गरजेचे आहे.

महाविद्यालयाशी संपर्क साधल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सीईटी सेलशी धाव घेतली. मात्र, तेथूनही ठोस तोडगा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची अवस्था बिकट झाली आहे. एका बाजूला प्रवेश मिळालेला, दुसरीकडे महाविद्यालय प्रवेश नाकारत आहे आणि तिसऱ्या बाजूला ऑटो-प्रीजमुळे दुसरा पर्याय निवडण्याचे दरवाजे बंद झाले आहेत. आता या विद्यार्थ्यांनी न्यायासाठी कोणाच्या दारात जायचे? असा संतप्त सवाल आता पालकांकडूनही उपस्थित होत आहे.

कॉलेजची भूमिका

यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, महाविद्यालय बंद करण्यासाठी ‘क्लोजिंग’चे अर्ज दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या वर्षी कॉलेज फक्त सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. कॉलेज का बंद करायचे? हा निर्णय विश्वस्त मंडळाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.