
श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला. शहरातील विविध भागांत सार्वजनिक मंडळे आणि गोविंदा पथकांकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर धार्मिक वातावरण आणि सायंकाळनंतर डीजेच्या तालावर रंगलेला उत्साह यामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि परिसर दणाणून गेला होता.
दिल्ली गेट, माळीवाडा, आडते बाजार परिसर, सावेडी उपनगर, गंगा उद्यान परिसर, तसेच भिंगार आणि केडगाव भागात दहीहंडी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मंडळांनी आकर्षक दहीहंडी उभारून गोविंदा पथकांना आमंत्रित केले होते. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. ‘गोविंदा आला रे आला’च्या निनादाने परिसर दुमदुमून गेला.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी डीजेचा दणदणाट सुरू होता. डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला. विविध मंडळांच्या मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज आणि कृष्णभक्तीच्या घोषणांमुळे शहरातील वातावरण उत्साहमय झाले होते. काही प्रमुख चौकांमध्ये दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दिल्ली गेट, माळीवाडा, आडते बाजार, सावेडी, भिंगार आणि केडगाव परिसरात पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रमुख मार्गांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.


























































