अमृतसर विमानतळावर ड्रोनच्या घिरट्या? सुरक्षेच्या कारणास्तव 7 विमानांचा मार्ग बदलला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील अमृतसर येथील श्री गुरूरामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री अचानक खळबळ उडाली. विमानतळाच्या धावपट्टी आणि परिसरात आकाशात काही संशयित वस्तू उडत असल्याचे आढळून आले. प्राथमिक पाहणीत या वस्तू ड्रोनसारख्या दिसत असल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) तातडीने अलर्ट जारी केला.

ही घटना रात्री साधारण 10 वाजता घडली. रनवे आणि विमानतळाच्या अत्यंत संवेदनशील परिसरावर काही काळ या वस्तू घिरट्या घालत होत्या. सुरक्षेचा उपाय म्हणून अमृतसरकडे येणाऱ्या 7 विमानांचे मार्ग बदलून त्यांना इतर ठिकाणी वळवण्यात आले. यातील काही विमाने दिल्ली तर काही चंदीगड विमानतळाकडे रवाना करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, या वस्तू रुडाला या गावातून विमानतळाच्या दिशेने आल्याचे दिसून आले. अमृतसर हा हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेजवळील संवेदनशील जिल्हा असल्याने विमानतळ परिसरातील या हालचालींना अत्यंत गंभीर सुरक्षा आव्हान मानले गेले आहे. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), पंजाब पोलीस आणि इतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना तात्काळ सतर्क करण्यात आले.

सध्या आकाशात दिसलेल्या या वस्तू नक्की ड्रोन होत्या की अन्य काही, याचे ठोस उत्तर मिळालेले नाही. सुरक्षा यंत्रणांकडून या वस्तूंचे मूळ शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. घटनेनंतर विमानतळ परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.