
ईशान किशनच्या धडाकेबाज फटकेबाजीने आजचा दिवस गाजवला. दुलीप ट्रॉफीच्या फायनलच्या दुसऱ्या दिवशी किशनने तुफानी फटकेबाजी करत द्विशतकालाही गवसणी घातली. किशनला कुमार कुशाग्रची सुरेख साथ मिळाली आणि त्यामुळेच पूर्व विभागाला पहिल्या डावात 708 धावांचा डोंगर उभारता आला. त्यामुळे आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण विभाग दमदार फलंदाजी करतो की पूर्व विभाग त्यांना गुंडाळतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
किशन जेव्हा सोमवारी फलंदाजी उतरला तेव्हा त्याचे शतक तर झालेले होते, पण तो आजच्या दिवसात किती धावांचा पाऊस पाडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. किशान आणि कुशाग्र या जोडीने दिवसाच्या सुरुवातीपासून गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. या दोघांनी मिळून गोलंदाजांचे धुलाईसत्र सुरू ठेवले आणि पाचव्या विकेटसाठी तब्बल 230 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. किशनने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला आणि कुशाग्रने काही वेळातच आपले शतकही साजरे केले. ही जोडी आता मॅरेथॉन भागीदारी रचणार असे वाटत होते, पण शतक झाल्यावर कुशाग्र फक्त एकच धाव करू शकला आणि दक्षिण विभागाच्या विजयने त्याला बाद करत ही जोडी फोडली. कुशाग्रने 8 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर 101 धावांची खेळी साकारत ईशान किशनला त्याने दणदणीत साथ दिली.
कुशाग्र बाद झाल्यावर पूर्व विभागाच्या धावसंख्येला ब्रेक लागेल असे वाटत होते; पण किशन काही आपली फटकेबाजी थांबवणारा नव्हता. किशनने तळाच्या फलंदाजांना साथीला घेतले आणि दक्षिण विभागावर त्याने पुन्हा एकदा हल्ला चढवला. किशनने आपले द्विशतक झळकवले आणि त्याच्या फलंदाजीची धार अधिक आक्रमक व्हायला लागली. अनुकूल रॉय (45) मोहम्मद कुरेशी (40) आणि मोहम्मद शमी (28) यांनी किशनला चांगली साथ दिली. त्यामुळेच किशनला 270 धावांची अप्रतिम खेळी साकारता आली. या खेळीत किशनने तब्बल 334 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये तब्बल 30 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. किशन बाद झाला आणि त्याच 708 धावसंख्येवर पूर्व विभागाचा डाव आटोपला.
किशन झाला होता रिटायर्ड हर्ट
ईशान किशनने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शानदार फलंदाजी केली. पूर्व विभागाकडून कर्णधारपदाची खेळी खेळताना त्याने 250 धावा केल्या. त्यानंतर दुखापतीमुळे तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला, पण तरीही तो पुन्हा एकदा मैदानात परतला आणि त्याने आपल्या फटकेबाजीच्या जोरावर 270 धावा फटकावल्या.
ईशानचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हुकला
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईशान किशनने झुंजार फटकेबाजी करत 270 धावा केल्या खऱ्या, पण त्याचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मात्र यावेळी हुकला. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम उत्तर विभागाच्या नावावर आहे. 1987 मध्ये उत्तर विभागाने पश्चिम विभागाविरुद्ध एका डावात 868 धावा केल्या होत्या. त्याच सामन्यात रमण लांबाने 320 धावा केल्या होत्या. या डावात किशन आणि त्याच्या संघाला दोन्ही विक्रम मोडण्याची संधी होती, पण किशन 270 धावांवर बाद झाल्यानंतर सर्व आशा मावळल्या.
द्विशतकी क्लबमध्ये किशनची एंट्री
ईशान किशनने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या उल्लेखनीय फलंदाजांच्या यादीत आपले नाव जोडले आहे. त्याच्या आधी रमण लांबा, गगन खोडा, यशस्वी जैस्वाल, चेतेश्वर पुजारा, अंशुमन गायकवाड आणि युसूफ पठाण यांनी ही कामगिरी केली आहे.
7 षटकार अन् 27 चौकारांचा पाऊस
ईशान किशनने 301 चेंडूंमध्ये 250 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर दुखापतीमुळे तो रिटायर्ड हर्ट झाला. या खेळीदरम्यान त्याने 27 चौकार आणि 7 षटकार मारले. द्विशतक पूर्ण करण्यापूर्वी किशनने फक्त दोन षटकार मारले होते, पण त्यानंतर त्याने वेग वाढवला आणि पुढच्या 50 पैकी 30 धावा केवळ षटकारांनीच केल्या.
द्विशतक झळकवणारा दुसराच कर्णधार
ईशान किशन या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. त्याने 2014 मध्ये 217 धावा करणाऱ्या नमन ओझाचा विक्रम मोडला. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकवणारा ईशान हा केवळ दुसरा कर्णधार आहे. 1987 मध्ये पश्चिम विभागाचे कर्णधारपद भूषवताना अंशुमन गायकवाड यांनी 216 धावा केल्या होत्या. दुलीप
ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकवणारा तो पूर्व विभागातील पहिला खेळाडू आहे. या डावातील 250 धावांसह ईशान किशनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4000 धावादेखील पूर्ण केल्या.
संक्षिप्त धावफलक
पूर्व विभाग ः 163 षटकांत सर्व बाद 708 (ईशान किशन 270, कुमार कुशाग्र 101; त्रिपुरना विजय 4/180) वि. दक्षिण विभाग.



























































