
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील वाढता गैरप्रकार, पेपरफुटीविरोधात पुण्यात सोमवारी विद्यार्थ्यांनी ‘एल्गार’ पुकारला. ‘एमपीएससी’च्या संपूर्ण कारभारात पारदर्शकतेची मागणी करत ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयवर विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने सहभागी झाले. ‘आम्ही 12-12 तास अभ्यास करायचा आणि काही लोकांनी न शिकता केवळ पैसे फेकून अधिकारी व्हायचे का?’ असा संतप्त सवाल विचारत विद्यार्थ्यांनी ‘एमपीएससी’च्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही तर पुण्यात शास्त्री रोड येथे ‘जंतरमंतर’ करण्याचा इशारा मोर्चात देण्यात आला. ‘एमपीएससी अध्यक्षांचा तीन दिवसांत राजीनामा घ्या,’ असा अल्टिमेटमही विद्यार्थ्यांनी महायुती सरकारला यावेळी दिला. दरम्यान, शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते विश्वजीत कदम, इत्यादी उपस्थित होते. मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी ‘एमपीएससी अध्यक्ष हटाव, विद्यार्थी बचाव’ अशा जोरदार घोषणा दिल्या. हातात तिरंगा झेंडा घेऊन विद्यार्थ्यांनी दिलेल्या विविध मागण्यांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला. मोर्चात डॉ. विश्वजीत कदम यांनीही ‘जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहील,’ असा विश्वास दिला. ‘अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे!’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. मोर्चात डॉ. विश्वजीत कदम यांनीही ‘जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहील,’ असा विश्वास दिला.
पुण्यात ‘जंतर मंतर’ करू – रोहित पवार
पुढील तीन दिवसांत आयोगाने उत्तर न दिल्यास आणि सरकारने चर्चेसाठी न बोलावल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी दिला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यास विद्यार्थी आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ जाईल. मी जाणार नाही; पण जर त्यांना फसवले तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू. परवानगी मिळाली नाही, तर पुण्यातच ‘जंतर मंतर’ तयार करू,’ असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
एक जरी पुरावा दिला तरी क्षणात राजीनामा देईन – एमपीएससी अध्यक्ष भीमनवार
पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण दिले. आपल्याविरुध्द एक जरी पुरावा कुणी दिला तर क्षणभरही अध्यक्षपदावर राहणार नाही, तातडीने राजीनामा देईन, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीवर बोलताना भीमनवार यांनी स्पष्ट केले की, हा संपूर्ण घटनाक्रम आपण आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीचा आहे. तक्रार प्राप्त होताच आयोगाकडून तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या पोलीस तपास वेगाने सुरू असल्याचे भीमनवार यांनी नमूद केले आहे.
























































