
पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीदरम्यान एका विनातिकीट प्रवाशाने तिकीट तपासनीसवर (टीसी) हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. टीसीने प्रवाशाकडे तिकीट नसल्यामुळे पाचशे रुपयांच्या दंडाची रक्कम मागितली. त्या दंडाची रक्कम भरण्यास प्रवाशाने नकार दिल्यानंतर टीसीने त्याला आरपीएफ कार्यालयात नेण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान प्रवाशाने टीसीच्या दिशेने हाताने जोरात ठोसा मारला. यावेळी चष्म्याची काच तुटून टीसीच्या डोळय़ाला गंभीर दुखापत झाली.
आशीष गुप्ता असे प्रवाशाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या टीसीचे नाव आहे. टीसीच्या तक्रारीवरून अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात हल्लेखोर प्रवासी अजय शिवकुमार धीवर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार टीसी गुप्ता हे बुधवारी सायंकाळी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन व चारच्या चर्चगेट बाजूकडील जिन्यावर तिकीट तपासणी करीत होते. यावेळी धीवर हा विनातिकीट असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे दंडाचे 500 रुपये मागितले असता त्याने केवळ 100 रुपये देण्यास तयारी दर्शवली. तो दंडाची पूर्ण रक्कम देत नसल्याचे पाहून गुप्ता यांनी त्याला आरपीएफ कार्यालयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान धीवरने गुप्ता यांच्या डोळय़ाच्या दिशेने हाताने ठोसा मारला. त्यात गुप्ता यांच्या चष्म्याची काच तुटून डोळय़ाखाली गंभीर दुखापत झाली. हल्ला करून पळणाऱया धीवरला गुप्ता यांनी पकडले. नंतर रेल्वे पोलीस आणि आरपीएफ कर्मचाऱयांनी आरोपी धीवर याला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अंधेरी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
डोळय़ाजवळ सात टाके
फुकटय़ा प्रवाशाच्या हल्ल्यात तक्रारदार टीसीचा डोळा थोडक्यात बचावला, मात्र डोळय़ाजवळच गंभीर दुखापत झाल्यामुळे सात टाके मारावे लागले. टीसीला जोगेश्वरी पूर्वेकडील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे तातडीचे उपचार घेतल्यानंतर टीसीने अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

































































