टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : अंकित, जतीन, समीरला बेड्या; अनिल पंडितच्या होते संपर्कात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी तिघांना अटक केली. त्यातील दोघे परदेशात असलेल्या अनिल पंडित या बिष्णोई गँगच्या पंटरच्या संपर्कात होते. तर एकजण आरोपींसोबत मुंबईत होता. तिघांनाही किल्ला कोर्टात हजर केले असता 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टायगरवरील गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. गुरुवारी चौघांना अटक करून कोर्टात हजर केले होते. आज अंकित खटक, जतीन पांचाळ आणि समीर खत्री अशा तिघांना पकडले आहे. यातील अंकित आणि समीर हे परदेशात बसलेल्या अनिल पंडित याच्या संपर्कात होते असे समजते, तर समीर हा मुंबईत आरोपींसोबत होता. तिघांचाही गुह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. गुह्यात वापरलेले शस्त्र कुणाल आणि सुमित यांनी अमृतसर येथून आणले होते. त्यावेळी जतीन हादेखील त्यांच्यासोबत अमृतसरला गेला होता. तर अमेरिकेत असलेला आणि बिष्णोई गँगशी संबंधित असलेल्या अनिल पंडित याच्या दोन आरोपी संपर्कात होते असेही समोर आल्याने गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळ तसेच अन्य ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील आरोपींच्या हालचाली दिसून आल्या आहेत.