‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’चा निर्धार कायम, सीमाभागात ‘काळा दिन’ कडकडीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाषावार प्रांतरचनेवेळी इच्छेविरुद्ध जबरदस्तीने कर्नाटकात घुसडण्यात आल्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्याच्या स्थापनादिनी सीमाभागातील मराठी भाषिकांकडून कडकडीत काळा दिन पाळून केंद्र आणि कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. ‘बेळगाव, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे नाही पुणाच्या बापाचे’, ‘बेळगावी नाही बेळगावचं’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल मे’, अशा घोषणा देत, हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या मराठी भाषिकांनी गेल्या 70 वर्षांपासून आजही 865 मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात येण्याचा निर्धार कायम असल्याचे ठणकावून सांगितले. काळे ध्वज आणि काळी वस्त्र घालून मूक सायकल फेरीने सीमाभाग दणाणून गेला होता. विशेष म्हणजे मराठी भाषिक चळवळीच्या या लढ्यात आता पाचवी पिढीही उतरल्याचे दिसून आले.

बेळगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथून सकाळी नऊच्या सुमारास या मूक सायकल फेरीस सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीत गल्लीबोळातून मराठी भाषकांचे जथेच्या जथे सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख मार्गावरून आलेल्या या भव्य रॅलीचा समारोप मराठा मंदिर येथे सभेने झाला. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर तसेच माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मार्गदर्शन केले. आजही महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने धडपडत आहेत. कानडी अत्याचाराच्या वरवंटय़ाखाली अन्याय सहन करत लढा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे; पण अजूनही निर्णय होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात पुन्हा सामील होण्यासाठी सीमावासियांचे प्राण आतुरल्याचेही प्रकाश मरगाळे यांनी सांगितले. या मूक फेरीमध्ये शिवसेनेचे बेळगाव सीमाभाग सह संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, विनायक हुलजी, मल्हारी पावशे, विजय कामत, दिलीप बैलूरकर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना चपराक

यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सायकल फेरीत केवळ तीनशेच मराठी भाषिक येत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्याबाबत कन्नड संघटनांशी बोलताना वक्तव्य केले होते. यातून मराठी भाषिकांचा एकप्रकारे अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याने सीमा भागातील मराठी भाषिकही पेटून उठले. आजच्या मुक फेरीत तीनशे नव्हे; तर तीस हजारांहून अधिक मराठी भाषिक सहभागी झाले होते.