पडद्याआडून – 23 वा मजला; मैत्री, यश, संशय आणि विश्वासघाताचा रंगतदार खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग खोत

मैत्रीच्या नात्याला जेव्हा पैशाची, प्रसिद्धीची आणि महत्त्वाकांक्षेची किनार लाभते, तेव्हा त्या नात्याचे रंग बदलायला वेळ लागत नाही. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे मित्र अचानक एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतात, त्यांच्या महत्त्वाकांक्षा दिसून येतात आणि विश्वासाच्या जागी संशयाची भिंत उभी राहते. अशाच मानवी स्वभावातील काळय़ा-पांढऱया छटांचा, मैत्रीतील गुंतागुंतीचा आणि सूडाच्या धोकादायक खेळाचा वेध घेणारे ‘23 वा मजला’ हे नवे मराठी सस्पेन्स थ्रिलर रंगभूमीवर दाखल झाले आहे.

शिरीष देखणे यांच्या लेखणीतून उतरलेले आणि विजय पेंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेले हे नाटक एका मूळ इंग्रजी नाटकावर आधारित आहे. दोन लेखक, त्यांच्यातील व्यावसायिक भागीदारी, महत्त्वाकांक्षा, विश्वासघात आणि या सगळय़ातून खेळवलेले रहस्य अशी या नाटकाची मांडणी आहे. यशाच्या उंचीवर पोहोचलेल्या माणसांच्या आयुष्यात डोकावण्याची ही एक संधी आहे. बाहेरून सुखसमृद्धी, प्रसिद्धी आणि पैसा यांचा झगमगाट; पण आत मात्र असुरक्षितता, न्यूनगंड, लोभ आणि एकमेकांपासून दडवलेली रहस्ये! या विरोधाभासातूनच नाटकाचा थरार आकार घेतो.

नाटकाच्या पेंद्रस्थानी आहेत दोन यशस्वी लेखक, शेखर देशमुख आणि अमित यादव. त्यांची गेल्या दहा वर्षांतली व्यावसायिक भागीदारी आणि मालिका, चित्रपट व नाटकांच्या लेखनातून मिळवलेले भरघोस यश यामुळे त्यांचे नाते टिपून आहे. मात्र, यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आता त्या नात्याला तडे जाऊ लागले आहेत. शेखरला वेगळं होऊन काम करून बघायचं आहे तर अमित पूर्णतः शेखरवर अवलंबून असल्याने त्याला वेगळं होऊ द्यायचं नाही. त्यासाठी त्याचा आटापिटा सुरू आहे आणि त्याच्याकडे असलेल्या एका गुपिताचा तो शस्त्र म्हणून वापर करतोय. त्यांच्यातील सर्जनशील मतभेद वैयक्तिक वादात बदलतात आणि या दोन मित्रांच्या मनात एकमेकांविषयी संशयाची बीजे रुजू लागतात. या कथेत शेखरची बायको शिल्पासुद्धा आहे. नाटकातल्या काही गोष्टी तिच्याभोवती फिरतात. या नाटकाचे वैशिष्टय़ म्हणजे गुन्हेगारीचा थरार दाखवतानाच मानवी स्वभावातील ग्रे शेड्स उलगडण्याचा केलेला प्रयत्न. प्रसिद्धी टिकवण्याची धडपड, आर्थिक व्यवहारातील गुंतागुंत आणि दुसऱयाच्या यशाबद्दल मनात निर्माण होणारी असूया यांचा परिणाम नात्यांवर होतो. मित्राच्या मनात दडलेला प्रतिस्पर्धी जागा होतो आणि मग सुरू होतो एक धोकादायक खेळ, जो प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो.

लेखक शिरीष देखणे यांनी मूळ कलापृतीशी प्रामाणिक राहून संहिता लिहिली आहे. दिग्दर्शक विजय पेंकरे या चतुरस्र दिग्दर्शकाचा हा हातखंडा जॉनर असल्याने त्यांनी हे रहस्य परिणामकारकपणे खेळवले आहे. विशेषतः नाटकाच्या उत्तरार्धात प्रेक्षकाला विचार करायलाही त्यांनी वेळ दिला नाही इतक्या वेगाने हे नाटक पुढे जाते.

तरुण लेखकाची भूमिका साकारणारा शशांक केतकर या नाटकातील महत्त्वाचा दुवा आहे. मालिका, चित्रपट आणि नाटकांसाठी लेखन करणाऱया या पात्राच्या आयुष्यात यशाबरोबरच काही गुपितेही दडलेली आहेत. मतभेद जेव्हा वैयक्तिक पातळीवर पोहोचतात, तेव्हा निर्माण होणारी अस्वस्थता या भूमिकेतून व्यक्त करण्याचे आव्हान शशांकने लिलया पेलले आहे. त्याला शिल्पाच्या भूमिकेतील मयुरी वाघ हिने चांगली साथ दिलीय. विशेषतः मयुरीचे दीर्घ कालावधीनंतर रंगभूमीवर पुनरागमन होत असल्याने तिच्याबद्दल अधिक उत्सुकता आहे. अनिकेत विश्वासराव याने साकारलेलं अमित यादव हे धूर्त आणि चाणाक्ष पात्र त्याच्या बोलण्यावागण्यातून आणि पेहरावातून लेखक वाटत नाही हा एक कच्चा दुवा आहे. बाहेरून यशस्वी दिसणाऱया या व्यक्तिमत्त्वाच्या खासगी आयुष्यात मात्र आर्थिक अडचणी, कर्जाचा डोंगर, असुरक्षितता आणि न्यूनगंड यांचे सावट आहे. मिळवलेला पैसा उधळण्याची सवय आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती त्याच्या आयुष्यातील गुंतागुंत वाढवते. या विरोधाभासी व्यक्तिमत्त्वातून अनिकेतला अभिनयाची वेगळी बाजू दाखवण्याची संधी मिळालीय. या तीन प्रमुख व्यक्तिरेखांसोबत दुसऱया अंकात येणारे चौथे पात्र सुजित देशपांडे यांनी साकारलेय. त्या पात्राची ओळख नाटकातूनच होणे इष्ट.

नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळय़े यांचे, संगीत अजित परब यांचे, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची, तर वेशभूषा मंगल पेंकरे यांची आहे. गगनचुंबी इमारतीतील बंदिस्त अवकाश, संशयाचे वातावरण आणि पात्रांमधील बदलते संबंध यांना रंगमंचीय रूप देताना या सगळय़ांनीच उत्तम कामगिरी करून दाखवलीय. सस्पेन्स-थ्रिलर नाटकात प्रकाश आणि ध्वनी हे केवळ सजावटीचे घटक नसतात; ते कथानकाच्या उत्पंठावर्धक प्रवासातील महत्त्वाचे साथीदार असतात हे इथे अधोरेखित होतेय. नेपथ्यात तांत्रिक करामतींचा चांगला वापर केला गेलाय. मराठी रंगभूमीवर विनोदी आणि काwटुंबिक नाटकांची लोकप्रियता कायम असताना सस्पेन्स थ्रिलर हा प्रकार प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देतो.

23व्या मजल्यावर नेमके काय घडते? कोणाचे रहस्य उघड होते आणि मैत्रीचा हा खेळ कोणत्या टोकाला पोहोचतो? याची उत्तरे रंगमंचावर मिळतीलच. मात्र, या नाटकाचा खरा प्रश्न केवळ ‘पुढे काय घडणार?’ हा नाही, तर यशाच्या उंचीवर पोहोचल्यावर माणूस आपल्या मित्राला किती ओळखतो आणि स्वतःच्या मनात दडलेल्या लोभाला किती ओळखतो, हा आहे. कारण इमारतीचा मजला कितीही उंच असला तरी माणसाच्या मनातल्या संशयाची खोली त्याहून अधिक असू शकते!

nलेखक ः शिरीष देखणे

nदिग्दर्शक ः विजय पेंकरे

nकलाकार ः शशांक केतकर, मयुरी वाघ, सुजित देशपांडे आणि अनिकेत विश्वासराव

nनेपथ्य ः प्रदीप मुळय़े

nप्रकाश ः शीतल तळपदे

nवेशभूषा ः मंगल पेंकरे

nसंगीत ः अजित परब

nनिर्माते ः आकाश भडसावळे, स्फूर्ती श्रीकांत तटकरे, समिता भरत काणेकर

छायाचित्र सौजन्य – संजय पेठे