
हिंदुस्थानी बुद्धिबळाचे भवितव्य असलेल्या खेळाडूंच्या सहभागामुळे चुरशीच्या झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱया टप्प्याला दिमाखात सुरुवात झाली. पहिल्याच दोन फेऱयांत अग्रमानांकित युवा बुद्धिबळपटूंनी आपली ताकद दाखवत विजयाचा झंझावात निर्माण केला. मात्र, बिगरमानांकित खेळाडूंनीही दिग्गजांना कडवी टक्कर देत स्पर्धेतील चुरस अधिकच वाढवली आहे.
इंडियन चेस स्कूल आयोजित या तीन दिवसीय स्पर्धेत 9 वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित अध्वान ओसवाल (1724) आणि पहिल्या टप्प्यातील 7 वर्षांखालील विजेता इवान दुबे (1545) यांनी प्रत्येकी दोन विजयांसह आघाडी घेतली. वीर शाह, अथर्व मुळीक, आरव देशमुख आणि निवेश पांचाळ यांनीही दोन गुण मिळवले. बिगरमानांकित धार्विक परब, शिवांश भाला, वीरेन बोरिचा आणि झियान फतनानी यांनीही लक्ष वेधले. मुलींच्या गटात लिया कृष्णन (1558) हिने सलग दोन विजय मिळवत वर्चस्व गाजवले.
13 वर्षांखालील खुल्या गटात एआयएम कश्यप खाखरियाने (1789), तर मुलींच्या गटात अग्रमानांकित त्वेषा जैन (1697) हिने दोन विजयांसह आघाडी घेतली. प्रणिता भावा, महुआ देशपांडे, अरिहा देवरुखकर, निश्का अग्रवाल आणि तिस्या पट यांनीही आव्हान कायम ठेवले. 17 वर्षांखालील खुल्या गटात एआयएम हृदय मनियार (1910) याने दोन्ही डाव जिंकत प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला. मुलींच्या गटात अग्रमानांकित दृश्या नाईक (1713) हिनेही विजयी घोडदौड कायम राखली.




























































