
>> बाळासाहेब लबडे
अहल्या हा कवितासंग्रह कवयित्री रचना यांनी भारतातील ज्येष्ठ कवी फनी महांती यांच्या कवितांचं केलेलं पुनःसर्जन आहे. त्यानिमित्ताने ओरिसाच्या ओडिया भाषेतील कविता मराठीत आलेली आहे. पौराणिक कथांमधून चालत आलेली स्त्राr पात्रे ही बहुतांश वेळा पुरुषप्रधान संस्कृतीच्या चौकटीत आणि तिच्या मर्यादांमध्ये बंदिस्त राहिलेली दिसतात. त्यांपैकीच एक पौराणिक पात्र म्हणजे ‘अहल्या’. ओडिया भाषेतील ख्यातनाम कवी डॉ. फनी महांती यांनी ‘अहल्या’ या दीर्घ कवितासंग्रहातून या पारंपरिक प्रतिमेला अत्यंत प्रभावीपणे छेद दिला आहे.
ओडिया भाषेतील या मूळ दीर्घ कवितेचा मराठीत ‘रचना’ यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि समर्थपणे अनुवाद केला आहे. हा संग्रह केवळ एका पौराणिक पात्राचा पुनराविष्कार नसून, तो वैश्विक स्त्राrवादी, रूपवादी आणि सौंदर्यवादी दृष्टिकोनाचा एक उच्च साहित्यिक दस्तावेज आहे. भारतीय पौराणिक साहित्यात अहल्या म्हणजे गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा झालेली आणि रामाच्या चरणस्पर्शानंतर मुक्त झालेली एक ‘पीडित’ व ‘निसहाय’ स्त्राr, अशी प्रतिमा रूढ आहे. परंतु फनी महांती यांच्या ‘अहल्या’ या संग्रहात ती एक निक्रिय शिळा राहिलेली नाही; तर ती तिच्या अस्तित्वाचे प्रश्न विचारणारी, इतिहासाच्या क्रूर वास्तवाशी झगडणारी आणि स्वतच्या स्वातंत्र्याचा हुंकार भरणारी एक विद्रोही व चेतनासंपन्न स्त्राr बनून समोर येते. या कवितेत अहल्या ही पुरुषी व्यवस्थेच्या अन्यायकारक नियमांना आव्हान देणारी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रगट होते.
या कवितेतील स्त्राrवादी जाणिवा केवळ वैयक्तिक वेदनेपुरत्या मर्यादित नसून त्या वैश्विक पातळीवर पसरलेल्या आहेत. मानवी इतिहासातील शोषणाचे आणि अन्यायाचे सार्वत्रिक रूप अहल्याच्या अनुभूतीतून व्यक्त होते. स्त्राrचे आयुष्य, तिचे शरीर आणि तिच्या अस्मितेवर लादलेली बंधने यावर हा संग्रह मार्मिक भाष्य करतो.
भिंतीविहीन, माझी स्थिती
मृत्युमय …!, पृथ्वीवरील दुःखात
दैण्यात, भय आणि विषादात जीर्णशीर्ण
या ओळींमधून स्त्राrच्या आयुष्यातील अमर्याद कोंदटपणा, तिचे वैश्विक दुःख आणि तिची घुसमट अत्यंत तीव्रतेने जाणवते. केवळ एका पौराणिक अहल्याची ही कहाणी नसून ती जगभरातील शोषित आणि वंचित स्रीच्या व्यथेचे प्रतिनिधित्व करते. सौंदर्यवादाचा विचार करताना, कवीने दुःख आणि वेदनेलाही एका विशिष्ट काव्यात्मक सौंदर्याची किनार दिली आहे.
विषादाच्या गडद मेघाने
आल्हादित आकाश
संभाव्य आणि अव्यक्त यंत्रणेत
फिकट चेहरा अनुशासन क्षीण आणि
दुर्बल परंपरा, मर्यादा, आदर्श
संपूर्ण निधिन्र ….!
पारंपरिक जडरूपांना छेद देत आधुनिक मनाची व्यथा या प्रतीकांमधून व्यक्त होते.
मूळ ओडिया भाषेतील काव्यात्मकता, तिची अंतस्थ ऊर्जा, तात्त्विक खोली आणि भावनिक तीव्रता मराठीत उतरवणे हे तसे आव्हानात्मक काम होते. परंतु, अनुवादक ‘रचना’ यांनी हे शिवधनुष्य अतिशय यशस्वीपणे पेलले आहे. ओडिया भाषेतील शब्दरचना आणि मराठी भाषेची प्रकृती यांचा सुसंवाद साधत त्यांनी अनुवादात कुठेही कृत्रिमता किंवा भाषांतरित असल्याचा सुगावा लागू दिलेला नाही. विशेषत वेदना, विद्रूपता आणि विद्रोहाचे भाव मराठी शब्दांतून अत्यंत ताकदीने आणि सहजतेने प्रगट होतात.
शब्दरक्तजित होऊन, जन्म घेणारा
कणाकणांत निकोप जाईल, शब्द भाषेचे
फांदीवरील फूल फुलण्याच्याआधी
सुकून जाईल….!
अशा ओळींचा अनुवाद करताना मराठी भाषेची समृद्धता आणि लवचिकता उत्तम प्रकारे वापरली आहे. शब्दांची निवड आणि वाक्यांची बांधणी अनुवादिकेच्या प्रगल्भ भाषिक जाणिवेची साक्ष देते. तरल सौंदर्यपूर्ण प्रतिमांचा वापर अनुवादिकेने केलेला आहे. त्यामुळे हा अनुवाद उच्च पातळीवर अर्थाची अनेक सूचने करणारा आहे. आणि प्रतिमांमध्ये अर्थाची धुसरता दिसून येते. नेणिवेच्या पातळीवर व्यक्त झालेल्या या प्रतिमा खूपच सौंदर्यपूर्ण आहेत.
डॉ. फनी महांती यांची ‘अहल्या’ ही कविता पौराणिक संदर्भांना आधुनिक मानवी व स्त्राrवादी मूल्यांच्या एरंडावर तपासून पाहणारी एक महत्त्वाची कलाकृती आहे. आणि ‘रचना’ यांनी मराठीत आणलेला हा अनुवाद मराठी वाङ्मय प्रांतात एक मोलाची भर घालणारा ठरतो. स्त्राrच्या आंतरिक संघर्षाचे, वेदनेचे आणि तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचे दर्शन घडवणारा हा काव्यसंग्रह वाचक आणि अभ्यासकांसाठी एक अत्यंत समृद्ध अनुभवासह विचार करायला प्रवृत्त करणारा असाच आहे.
अहल्या
मूळ कवी ः डॉ. फनी महांती
अनुवाद ः रचना
प्रकाशक ः साहित्य अक्षर प्रकाशन
पृष्ठे ः 85 ह किंमत ः 120



























































