
>> दुष्यंत पाटील [email protected]
खेडय़ातल्या स्वर्गीय सौंदर्याच्या सहवासात रमणारा चित्रकार जॉन सिंगर सार्जंट याचे हे चित्र. त्या काळात लोकप्रिय ठरलेले प्रेमगीत `कार्नेशन, लिली, लिली, रोझ’ या गाण्याचे बोल आणि सार्जंटने चितारलेले बागेतील जादुई दृश्याला सांधणारी ही कलाकृती कायमची लोकप्रिय ठरली.
जॉन सिंगर सार्जंट (1856-1925) हा चित्रकार जन्मानं अमेरिकन होता, पण त्याचं बालपण आणि तारुण्य संपूर्ण युरोपात भटकण्यात गेलं. त्याचे आई-वडील एका जागी स्थिरावणारे नव्हते. आज इटलीच्या फ्लॉरेन्समध्ये, तर उद्या फ्रान्सच्या पॅरिसमध्ये, परवा स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित पर्वतात, तर पुढच्या महिन्यात स्पेनच्या गल्लीबोळांमध्ये! सार्जंटला चित्रकार म्हणून जम बसवण्यासाठी काहीच संघर्ष करायला लागला नाही. खरे तर त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक जादू होती. तो अतिशय देखणा आणि सुसंस्कृत तर होताच, शिवाय त्याला अनेक भाषा अस्खलितपणे बोलता यायच्या. तो उत्तम पियानोवादकही होता. त्याचा उच्चभ्रू वर्तुळात वावर होता. त्याच्या बोटांमध्ये रंगांची अशी काही जादू होती की, त्या काळातले श्रीमंत, राजे-महाराजे आणि उद्योगपती स्वतचं पोर्ट्रेट (व्यक्तिचित्र) सार्जंटकडून बनवून घेण्यासाठी अक्षरश: अमाप पैसे मोजून आपला नंबर लावायचे!
इतकं स्वप्नवत आयुष्य जगणाऱया सार्जंटच्या आयुष्यात 1884 मध्ये एक वादळ आलं. 1884 मध्ये त्यानं पॅरिसच्या प्रसिद्ध कलाप्रदर्शनात एका अत्यंत श्रीमंत आणि देखण्या फ्रेंच महिलेचं `मॅडम एक्स’ नावाचं चित्र लावलं. त्यानं चित्रातल्या महिलेच्या काळ्या ड्रेसची एक नाजूक पट्टी खांद्यावरून किंचित खाली घसरलेली दाखवली होती. खरे तर आज आपण हे चित्र पाहिलं तर त्यात काहीच आक्षेपार्ह वाटणार नाही, पण त्या काळच्या सनातनी पॅरिसच्या समाजात यावरून प्रचंड टीका झाली. प्रकरण चांगलंच पेटलं. लोकांनी सार्जंटवर `अश्लील, उद्धट आणि संस्कृतीभ्रष्ट’ असा शिक्का मारला. सार्जंट इतका खचला की, त्याला पॅरिस सोडून लंडनला पळून यावं लागलं! नैराश्याच्या या काळात स्वतला पुन्हा शोधण्यासाठी आणि कलाविश्वात आपलं स्थान परत मिळवण्यासाठी सार्जंट लंडनच्या गजबजाटातून दूर एका छोटय़ाशा शांत खेडय़ात गेला.
या खेडय़ात स्वर्गीय सौंदर्य होतं. तिथे जुन्या पद्धतीची दगडी घरं होती, अंगणामध्ये गुलाब फुललेले असायचे. याच निवांत वातावरणात सार्जंट आपल्या मित्रांसोबत राहायला गेला होता. या ठिकाणी संध्याकाळी सगळे मित्र एकत्र येऊन गिटार वाजवायचे, कविता वाचायचे आणि जीवनावर गप्पा मारायचे.
सप्टेंबर 1885 च्या एका संध्याकाळी सार्जंट आपल्या काही मित्रांसोबत तिथल्या नदीच्या पात्रात एका लहान बोटीतून फिरत होता. सूर्य मावळला होता. नदीकाठच्या एका सुंदर घराच्या बागेवरून त्याची बोट चालली होती. अचानक सार्जंटची नजर त्या बागेत गेली. तिथे झाडांच्या फांद्यांवर चायनीज लँटर्न (कागदी कंदील) लटकवलेले होते. दोन लहान मुलं त्या कंदिलांमध्ये दिवे लावत होती. त्या कंदिलांचा लाल-पिवळा प्रकाश तिथल्या पांढऱया लिलीच्या फुलांवर आणि हिरव्या पानांवर परावर्तित होत होता. हे दृश्य पाहून सार्जंट भारावून गेला. त्याला नेमका हाच क्षण कॅनव्हासवर आणायचा होता. त्या काळात `कार्नेशन, लिली, लिली, रोझ’ नावाचं एक प्रेमगीत लोकप्रिय झालं होतं. सार्जंटला त्या बागेतल्या जादुई दृश्याला आणि त्या गाण्याच्या बोलांना एकत्र आणून एक अजरामर चित्र तयार करायचं होतं. यातूनच सार्जंटनं `कार्नेशन, लिली, लिली, रोझ’ हे अजरामर चित्र काढलं.
चित्रातले चिनी आकाश कंदील आपलं लक्ष वेधतात. त्या कंदिलांमधून बाहेर पडणारा केशरी प्रकाश संपूर्ण चित्राचं केंद्रस्थान आहे. चित्रामध्ये दोन लहान निरागस मुली दिसतात. डाव्या बाजूची मुलगी (जिचं नाव डॉली आहे) पूर्ण एकाग्रतेनं मेणबत्ती पेटवताना दिसतेय. उजव्या बाजूच्या मुलीचं (पॉली) लक्षही तिच्याकडे असणाऱया आकाश कंदिलाकडे आहे. दोघींचेही पांढरे फ्रॉक्स साधे आहेत. चित्राच्या वरच्या भागात पांढऱयाशुभ्र लिलीची फुलं दिसतात. या चित्रात वर आकाश दिसतच नाही! त्याऐवजी सार्जंटनं संपूर्ण कॅनव्हास फुलांनी आणि पानांनी खच्चून भरून टाकलाय.
वरवर पाहिलं तर हे चित्र फक्त दोन मुली आणि फुलांचं एक देखणं दृश्य वाटू शकतं, पण सार्जंटचं हे चित्र नकळत अजूनही बरंच काही सांगून जातं.
सार्जंटनं या चित्रात एक `क्षण’ पकडण्याचा प्रयत्न केलाय. संध्याकाळचा संधिप्रकाश फक्त काही मिनिटांचाच असतो. त्यानंतर अंधाराचं राज्य सुरू होतं. असंच फुलंही सुंदर असली तरी दोन दिवसांत कोमेजून जमिनीवर पडणार असतात. फुलांचं आयुष्यही काही काळ टिकणारंच असतं. त्या लहान मुलींचं निरागस, आनंदी बालपणही चिरकाळ टिकणारं नाहीये. सार्जंटनं क्षणभंगुर असणाऱया या तीन सुंदर गोष्टी चित्रामध्ये आणल्या आहेत.
चित्राच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा गडद निळा-जांभळा अंधार हळूहळू पसरतोय, पण चित्रातले आकाश कंदील मानवी आशा, निष्पाप श्रद्धा आणि जिद्द यांची जाणीव करून देतात. आजही लंडनमधल्या `टेट ब्रिटन’ कलासंग्रहालयात हे चित्र पाहण्यासाठी लोक गर्दी करतात.































































