उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; बस 300 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, 20 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडच्या टिहरी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी पहाटे एक भीषण रस्ते अपघात घडला. सुमारे 30 ते 35 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलावरून जवळपास 300 फूट खोल दरीत कोसळल्याने किमान 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दरीतून आतापर्यंत सुमारे २० जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

ही बस हरिद्वारहून चमोलीच्या दिशेने जात होती. मंगळवारी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास गूलर बाजार परिसरातील गूलर पुलाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खोल दरीत कोसळली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस खोल दरीत कोसळल्याचे समजताच ब्यासी आणि ढालवाला येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) पथके तातडीने घटनास्थळी तैनात करण्यात आली आणि शोध व बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव व मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी टिहरीच्या जिल्हाधिकारी निकिता खंडेलवाल आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्वेता चौबे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

दरम्यान, उत्तराखंडच्या टिहरी गढवाल जिल्ह्यात झालेल्या या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, “या दुर्दैवी घटनेने मन व्यथित झाले आहे. अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो.”