
गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा भडका उडाला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही गडहिंग्लजच्या दुष्काळाबाबत कोणताच निर्णय न झाल्याने संतापलेल्या सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी आंदोलकांनी दसरा चौकात रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे चंदगड, आजरा, संकेश्वर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला दररोज वेगवेगळ्या घटकांचा पाठिंबा मिळत आहे. आंदोलकांनी दिवाळी सणदेखील रस्त्यावरच साजरा केला. नागेश चौगुले यांनी काळभैरी डोंगर ते गडहिंग्लज शहरापर्यंत देव देवतांना दंडवत घालत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
आमदार सतेज पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला होता. दुसरीकडे, मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनीही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होईल, असे ठोस आश्वासन दिले होते. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागले होते. मात्र, आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही गडहिंग्लज तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. सरकारने पुन्हा एकदा तोंडाला पाने पुसल्याने आंदोलकांच्या संयमाचा बांध फुटला.
या आंदोलनात जि. प. सदस्य अमर चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, युवासेनेचे जिल्हा युवाअधिकारी अवधूत पाटील, जिल्हा संघटक संभाजी भोकरे, माजी पं. स. सदस्य बाळेश नाईक, नागेश चौगुले, गुंडू पाटील, सचिन देसाई, अंकुश रणदिवे, मल्लिकार्जुन आरबोळे, संजय पाटील यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
रस्त्यावर टायर पेटवले; वाहतूक रोखली
– संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट दसरा चौकात धाव घेत सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आंदोलकांनी भररस्त्यात टायर पेटवून दिले आणि स्वतः रस्त्यावर आडवे पडून वाहतूक रोखून धरली. अचानक झालेल्या आक्रमक आंदोलनामुळे गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत दुष्काळाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संतप्त शेतकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱयांनी दिला आहे.



























































