
न्यायालयात दंडाची रक्कम भरल्यानंतरही जप्त केलेले ड्रायव्हिंग लायसन्स परत देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला अटक केली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अरबाज शेख (२७) याला रंगेहाथ पकडले. मुंब्रा वाहतूक उपविभागाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे एका कंपनीत चालक म्हणून काम करतात. २५ ऑक्टोबर रोजी मुंब्रा बायपास येथील बंद टोलनाक्याजवळ त्यांच्यावर महाप्रशासनाकडून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. यावेळी वाहतूक पोलिसांनी त्यांचे लायसन्स जप्त केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी २६ ऑक्टोबरला ठाणे न्यायालयात दहा हजार रुपयांचा दंड भरला. दंड भरल्याची पावती दाखवून लायसन्स परत मिळवण्यासाठी तक्रारदार २ नोव्हेंबरला मुंब्रा शहर वाहतूक उपविभागाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी अरबाज शेख याने लायसन्स परत देण्यासाठी लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.





























































