
कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात माणूस किती टोकाचे पाऊल उचलू शकतो, याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका व्यक्तीने त्याच्या 18 वर्षीय मुलाची हत्या केली, तर पत्नीवरही चाकू आणि हातोड्याने हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्नीला घरातील एका खोलीत कोंडून आरोपी पसार झाला. तब्बल तीन दिवसांनी पोलिसांनी महिलेची सुटका केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सुदीप (44) असे आरोपीचे नाव असून तो यापूर्वी खासगी बँकिंग क्षेत्रात काम करत होता. बंगळुरूमधील पद्मनाभनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये 16 नोव्हेंबर रोजी रात्री 9 ते 11 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांच्या तपासानुसार, सुदीपला पत्नी सीमा हिच्यावर विवाहबाह्य संबंधांचा संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या रात्री झालेल्या भांडणातून त्याने सीमा आणि 18 वर्षीय मुलगा सोहम यांच्यावर चाकू व हातोड्याने हल्ला केला. या हल्ल्यात सोहमचा मृत्यू झाला, तर सीमा गंभीर जखमी झाली. त्यानंतर त्याने सीमाला एका खोलीत कोंडले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या कुटुंबाच्या घरातून गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार भांडणांचे आवाज येत असल्याच्या तक्रारी शेजाऱ्यांनी घरमालकाकडे केल्या होत्या. घरमालकाने अनेकदा कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. तसेच घर सोडण्यासही सांगितले होते. 16 नोव्हेंबरच्या रात्री पुन्हा घरातून मोठ्या आवाजात भांडण सुरू असल्याची माहिती घरमालकाला मिळाली होती. मात्र, त्याने सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली असता त्यावेळी घरात शांतता असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान 19 नोव्हेंबरच्या रात्री घरमालक फ्लॅटवर गेला असता वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस, घरमालक आणि महिलेच्या मैत्रिणीने घटनास्थळी पोहोचून कुलूप तोडण्यासाठी चावीवाल्याला बोलावले.दरवाजा उघडल्यानंतर घरातील फरशी आणि भिंतींवर रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर एका बंद खोलीतून महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. पोलिसांनी खोली उघडून सीमाची सुटका केली. तिने दिलेल्या जबाबात सुदीपने आपल्यावर आणि मुलावर हल्ला केल्याचे सांगितले.
पोलिसांनी तपास केला असता, घरातील बाथरूममध्ये सोहमचा मृतदेह आढळून आला. जखमी सीमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या तक्रारीवरून बंगळुरूतील बनशंकरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत हत्या आणि कलम 109(1) अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी सुदीपला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
























































