
सोनगिरी तेलेवाडी येथील रहिवासी असलेल्या दीपक विजय रहाटे (वय २५) या तरुणाचा मृतदेह रेल्वे पटरीपासून काही अंतरावर आढळून आल्याने खळबळ उडाली. दीपक कामासाठी पीर लोटे येथे वास्तव्यास होता. २१ तारखेला रात्री तो अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.
शोध मोहिमेदरम्यान त्याची बाईक संगमेश्वर येथील गणेश हॉटेलच्या शेजारी नुकसानग्रस्त अवस्थेत आढळून आली. या घटनेनंतर पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मोबाईल फोन बंद झाला. अखेर दीपक सापडत नसल्याने कुटुंबीयांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबतची माहिती देत तक्रार नोंदवली.दरम्यान महाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे पटरीलगत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, तो मृतदेह पटरीपासून थोड्या अंतरावर होता. प्राथमिक तपासात संबंधित मृतदेहाची ओळख दीपक विजय रहाटे अशी पटवण्यात आली आहे.या घटनेमुळे दीपक रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे. संगमेश्वर आणि महाड पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.




























































