तंजावरचे स्थलमहात्म्य – तंजावरचा मराठी भाषक समाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. समीर जाधव

[email protected]

तंजावरच्या अप्रकाशित मोडी कागदपत्रांत कोणकोणती मराठी घराणी तिकडे स्थायिक झाली त्याची यादी मिळते. या यादीत एकूण 141 घराण्यांची नावे आहेत.

छत्रपती व्यंकोजीराजांनी आपली राजधानी बंगळुरूहून तंजावरास हलवली आणि राजांबरोबर त्यांचे ज्येष्ठ अधिकारी व दरबारातील मराठी विद्वान मंडळी तंजावरास स्थिर झाली. तंजावरच्या अप्रकाशित मोडी कागदपत्रांत कोणकोणती मराठी घराणी तिकडे स्थायिक झाली त्याची यादी मिळते. या यादीत एकूण 141 घराण्यांची नावे आहेत.

महाराष्ट्रातील लोक तंजावरमध्ये स्थायिक झाल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी ‘निघंटू’ व ‘भाषाप्रकाश’ हे दोन शब्दकोश मराठा राजांच्या काळात लिहिले गेले. ‘सरस्वती महाल ग्रंथालया’त या दोन शब्दकोशांची संपूर्ण हस्तलिखिते आजही उपलब्ध आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातही मराठी समाज आपली भाषा आणि संस्कृतीचे जतन करीत होता. मात्र तमिळींनी (द्रविड काझागम आणि पेरियार) हिंदी भाषेविरोधात आंदोलन केले. या आंदोलनामुळे तामीळनाडूमध्ये स्वभाषेचा आग्रह आत्यंतिक स्वरूपात वाढला. परिणामी 185 वर्षे तंजावरवर राज्य केलेल्या मराठय़ांची भाषा बोलीरूपातही (अपवाद करता) आज फारशी अस्तित्वात असलेली दिसत नाही.

2011 साली झालेल्या जनगणनेनुसार तंजावरची लोकसंख्या 26,12,816 इतकी आहे, मात्र त्यात मराठी भाषकांची संख्या किती आहे याची वेगळी नोंद सापडत नाही. त्याचे एक कारण म्हणजे जनगणनेच्या वेळी मराठी भाषक स्वतःची नोंद ही तमीळ भाषक म्हणूनच करतो. साधारणतः एकशेपन्नास मराठी कुटुंबे तंजावर आणि आजूबाजूच्या प्रदेशात स्थायिक असल्याची माहिती मिळते. विद्यमान कालखंडात तंजावरमध्ये मराठी भाषकांची संख्या इतकी कमी असण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे मराठी समाजाने शिक्षण-अर्थार्जनाच्या निमित्ताने बंगळुरू, चेन्नई, दिल्ली येथे स्थलांतर केले आहे.

तंजावर हे ठिकाण तामीळनाडू या राज्यातील आहे. तामीळनाडू हे राज्य स्वभाषेच्या बाबतीत कमालीचे अभिमानी, खरे तर दुराग्रही असल्याने शिक्षणाचे माध्यम प्रामुख्याने तमीळ आहे. तसेच दैनंदिन व्यवहाराची भाषा ही तमीळच आहे. तामीळनाडूच्या कोणत्याही प्रदेशात भारतातील अन्य भाषक स्थलांतरित झाले तर त्यांना तमीळ भाषा शिकून घ्यावीच लागते. कारण तमीळ भाषक इतरांच्या भाषेसाठी स्व-भाषेचा कोणत्याही परिस्थितीत त्याग करत नाहीत. वास्तविक 1975 पर्यंत ‘सरस्वती महाल’ आवारातील शाळेत मराठी हा विषय शिकवला जात होता, परंतु तेथील हिंदी भाषाविरोधी आंदोलनामुळे मराठी भाषा शिकवणेही बंद करण्यात आले. त्यामुळेच अपरिहार्यपणे तंजावर येथील मराठी भाषकांच्या शिक्षणाचे माध्यम तमीळ हेच राहिले आहे. परिणामी तंजावरी मराठी, दक्षिणी मराठी ही तंजावर येथील मराठी भाषकांची बोलीभाषा काही अंशी राहिली असली तरी त्यांचा सर्व जीवनव्यवहार हा तमीळ भाषेतच होतो.

तंजावरमधील मराठी भाषक व्यक्तीच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन इतर तमीळ भाषकांप्रमाणे नोकरी आणि व्यवसाय हेच आहे. डॉक्टर, वकील, शिक्षक या क्षेत्रातही मराठी भाषक व्यक्ती आहेत. तसेच हॉटेल व्यवसायातही मराठी भाषक व्यक्तींचा वावर दिसतो. उदाहरणार्थ, ‘सरस्वती महाला’ समोरच टपरीवजा ‘मिना हॉटेल’ हे टी. गणेश असे नाव असलेल्या मराठी माणसाचे आहे. मात्र हा हॉटेलमालक आपण मराठी समाजातील आहोत ही बाब कोणत्याही परिस्थितीत उघड होऊ देत नाही. याचाच अर्थ मराठी भाषक व्यक्ती तंजावरमध्ये वावरताना ते मराठी भाषक नसून जणू मूळ तमीळच आहेत असाच तिचा एकूण वर्तन व्यवहार असतो. तिचा पोषाख, तिचे अलंकार, तिचे वागणे, बोलणे हे सर्व तमीळ भाषकांप्रमाणेच असते. इतकेच नाही तर काही मराठी भाषक तर मराठी आडनावे न लावता तमीळ भाषकांप्रमाणेच केवळ वडिलांचे नाव लावतात. उदाहरणार्थ, गोपाळ गोस्वामी, बी. रामचंद्र, कृष्णा भीमस्वामी इत्यादी. प्रस्तुतच्या नावांवरून असे लक्षात येते की, मराठीभाषक व्यक्ती ही पूर्णपणे तमीळ संस्कृतीत मिसळून गेली आहे. एका अर्थाने या वर्तनाचे वर्णन प्रवाहपतीत होणे असेही करता येईल. अपवादात्मक काही व्यक्ती सोडल्यास तंजावरमधील मराठी भाषक व्यक्तींचा महाराष्ट्राशी, महाराष्ट्राच्या मराठी भाषेशी, मराठी माणसांशी, संस्कृतीशी जवळजवळ संबंध आढळत नाही. तंजावरमधील मराठी तरुण पिढीला महाराष्ट्रातील मराठी भाषा बोलता येत नाही. ती बोलता यावी असेही फारसे वाटत नाही. याबद्दल त्यांना फार खंतही वाटत नाही. या स्थितिगतीत तंजावरमध्ये जवळपास 185 वर्षे राज्य केलेल्या भोसलेराजांचे वंशजही अपवाद नाहीत.

असे असले तरी मराठी कुटुंबात परंपरेने चालत आलेले गणेश चतुर्थी, मकर संक्रांत, नवरात्र, मंगळागौर, गुढीपाडवा, रामनवमी, गोकुळाष्टमी हे सण आजही साजरे केले जातात. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जरा-जीवंतिका व्रत केले जाते त्याचप्रमाणे तंजावरमधील मराठी कुटुंबातील स्त्रिया वरमालक्ष्मी व्रत करतात. मकर संक्रांतीच्या हळदीकुंकवाचे स्वरूप मात्र महाराष्ट्रापेक्षा थोडे वेगळे आहे. ते असे- ओली हिरवी हळद, पान-सुपारी, दोन बांगडय़ा, फूल, केळे, चोळी, खण, हळद, पिंजरी हे सर्व साहित्य एकत्र करून वाण तयार केले जाते. तसेच तमीळ संस्कृतीच्या प्रभावाने मराठी कुटुंबात मोठय़ा आनंदाने आणि उत्साहाने पोंगळ तयार केले जाते .

सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, यूटय़ूब या आभासी माध्यमातून तंजावरमधील मराठी माणूस एकमेकांशी जोडलेला आहे. तंजावरमधील मराठी संस्कृती, तंजावरचा राजकीय इतिहास, मराठा राजे यांबद्दलची माहिती काही तरुण मंडळींकडून प्रसारित केली जाते. असे असले तरी आभासी माध्यमाद्वारे जोडला गेलेला तंजावरमधील मराठी माणूस हा राजकारण-समाजकारण यांमध्ये क्रियाशील दिसत नाही.  शिवाजी पुणतांबेकर यांनी आपली जमीन तंजावरमधील मराठी माणूस एकत्र यावा या हेतूने ‘मराठा समाज सभागृहा’ला दिली. या सभागृहात गणेश चतुर्थी, गुढीपाडवा हे सण उत्साहाने साजरे केले जातात. या सभागृहात गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यावेळी गणपतीला सहस्र तळणीच्या मोदकांचा अभिषेक केला जातो. याप्रसंगी तंजावरमधील मराठीभाषक समाज एकत्र येतो. परंतु त्यांचे हे एकत्रित येणे हे केवळ या कार्यक्रमांपुरतेच मर्यादित राहते हे खेदाने नमूद करायला हवे.

(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)