
मीरा-भाईंदरचा महापौर परप्रांतीय होईल अशी वल्गना भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी केल्यानंतर आमच्या शहराचा महापौर मराठीच हवा या मागणीसाठी आज लढाई पेटली. मीरा-भाईंदरच्या महापौर या डिंपल मेहता होतील असे भाजपने जाहीर केल्यानंतर शिवसेना, मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत महापालिकेवर धडक मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी रोखल्याने आंदोलनकर्ते संतापले. त्याआधी हा मोर्चा निघू नये यासाठी कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या. अनेकांची सकाळीच धरपकड केली. राजकीय आशीर्वादाने चाललेल्या पोलिसांच्या या दडपशाहीचा आंदोलनकर्त्यांनी कडकडीत निषेध केला.
मीरा-भाईंदरमध्ये भाजपचे ७८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील ४६ नगरसेवक हे मराठी आहेत. त्यापैकी कोणत्याही एका महिलेला महापौर करा, अशी आग्रही मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार नरेंद्र मेहता यांना निवेदनही दिले होते. पाच ते सहा वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ मराठी महिला नगरसेविका असतानाही महापौरपदासाठी नरेंद्र मेहता यांची वहिनी डिंपल मेहता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते संतापले. मीरा-भाईंदरचा महापौर मराठीच हवा, अशी मागणी करत आज सकाळी मोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या. अनेकांची सकाळी घरी जाऊन धरपकड केली. त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच संतापले. मोर्चा निघताच तो पोलिसांनी अडवला. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजप आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी बळाचा वापर करताच कार्यकर्ते आणि पोलिसांत धक्काबुक्कीही झाली.
मेहतांची घराणेशाही.. डिंपल मेहता महापौर
मीरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी स्वतःची घराणेशाही चालवली. त्यांनी त्यांची वहिनी डिंपल मेहता यांना महापौर केले. भाजपचे ७८ नगरसेवक असल्याने त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली. डिंपल मेहता यांना भाजपचे ७८ व अपक्ष १ अशी ७९ मते मिळाली. काँग्रेसच्या रुबिना शेख यांना १६ मते मिळाली.
नरेंद्र मेहता हे दुसरे मोरारजी देसाई
भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे मराठी माणसावर दडपशाही करणारे दुसरे मोरारजी देसाई आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाकावर टिच्चून मेहता यांनी अमराठी महापौर बसवला आहे, असा आरोप मराठी एकीकरण समितीने केला.































































