40 लाखांची दाढी, बोटांची नखेदेखील काही लाखांमध्ये… अल्लू अर्जुनचा ‘राका’ ठरतोय सर्वांवर भारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्लू अर्जुनची ओळख ही कथानकाला झोकून देणारा कलाकार म्हणून आहे. याचा प्रत्यय नुकताच आलेला आहे. त्याच्या वाढदिवशी रिलिझ झालेले ‘राका’चे पोस्टर पाहताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अल्लूचा असा लूक पाहताच, अवघ्या काही सेकंदातच या पोस्टरवर लाखो चाहत्यांनी प्रतिक्रियांचा भडीमार केला. अल्लूचा हा ‘राका’ लूक म्हणजे त्याच्यातील कलाकारासाठी एक आव्हान होते. अल्लूने या लूकसाठी तब्बल तीन तास मेकअप मध्ये घालवले आहेत. केवळ इतकेच नाही तर, हा मेकअप हा प्राॅस्थेटिक शैलीतला असल्याने, याकरता सर्वाधिक मेहनत घ्यावी लागलेली आहे. राकट आणि जंगली दिसणाऱ्या अल्लूची यातील दाढीच तब्बल 40 लाखांची आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दाढीला साजेशी या लूकमधील नखेदेखील आहेत. अल्लूचा लूक हा भन्नाट आणि अपिल होण्यासाठी त्याच्या लूकवर तब्बल काही करोड खर्च करण्यात आले आहेत.

राकामधील लूक हा अतिशय ओबड धोबड आणि राकट असल्याकारणाने, सर्वात आधी अल्लूने त्याच्या फिटनेसकडे लक्ष दिले होते. वजन आणि स्नायूंवर त्याने विशेषतः काम करुन या लूकला साजेसे स्वतःमध्ये बदल घडवून आणले. त्यानंतर खरी कसोटी होती ती, मेकअप करण्याची. त्वचेवरील जखमा दाखवण्यासाठी प्रामुख्याने प्राॅस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. विस्कटलेले केस आणि जंगली लूक तयार करण्यासाठी प्रत्येक वेळी त्याला किमान तीन तास मेकअपसाठी बसावे लागत होते. या चित्रपटामध्ये अल्लूच्या प्रत्येक सीनसाठी त्याने वेगवेगळा मेकअप अंगावर चढवला आहे हीच याची खास बाब आहे.

केवळ इतकेच नाही तर, देहबोली आणि अभिनय यांचीही उत्तम सांगड घालता यावी म्हणून, अल्लूने काही खास चालण्याच्या शैलींचाही अभ्यास केला होता. पात्रातील वैविध्य आणि अॅटीट्यूडसाठी देखील अल्लूने स्वतःला काही तास कोंडून घेतले होते अशी माहिती मिळत आहे. प्रत्येक संवादाची फेक कशी असावी, याकरता त्याने तब्बल सात ते आठ पद्धतीने स्वतःच्या आवाजांमध्ये बदल घडवून संवाद दिलेले आहेत. त्यामुळेच राका हा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे.