Pune News – रील्ससाठी हवालदाराच्या मुलाकडून हवेत गोळीबार, तीन वर्षांनी गुन्हा दाखल

सोशल मीडियावरील रील्ससाठी पुणे पोलीस दलातील हवालदाराच्या मुलाने चक्क वडिलांच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी ही रील्स बनवण्यात आली होती. रील्स व्हायरल झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार रमेश बाबुराव केकाण, त्यांची मुले पार्थ रमेश केकाण व अथर्व रमेश केकाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले हवालदार रमेश केकाण यांच्याकडे परवानाधारी रिव्हॉल्व्हर आहे. शस्त्र परवान्याचे नियम धाब्यावर बसवून हे रिव्हॉल्व्हर केकाण यांनी आपला मुलगा पार्थकडे दिले होते. पार्थने या रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. यावेळी पार्थचा मोठा भाऊ अथर्व याने या गोळीबाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. नंतर पार्थने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्हिडिओचा माग काढला. यावेळी हा व्हिडिओ इंदापूर तालुक्यातील कळस गावात काढला असून पोलीस हवालदार रमेश केकाण यांच्या मुलांनीच केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भादंवि कलम 336, 109, 114, भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 3 (25) व 30 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तेलकीकर करीत आहेत.