मुख्यमंत्र्यांनी दिलेला चेक झाला बाऊन्स!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला चेक बाऊन्स झाल्यामुळे एका विद्यार्थ्याला मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. बाराबंकी जिल्ह्यातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा चेक देण्यात आला होता. तो बाऊन्स झाल्यामुळे विद्यार्थ्याच्या खात्यातून पैसे कापले गेले आहेत.

बाराबंकी जिल्ह्यातील यंग स्ट्रीम इंटर कॉलेजचा विद्यार्थी असलेला आलोक मिश्रा याने बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले होते. जिल्ह्यातून अव्वल येताना त्याने राज्यभरातूनही सातवा क्रमांक पटकावला होता. २९ मे रोजी योगी आदित्यनाथांच्या हस्ते त्याचा लखनौ येथे सन्मान केला गेला आणि त्याला १ लाख रुपयांचा चेक पुरस्कार स्वरुपात देण्यात आला. आलोकने तो चेक ५ जून रोजी आपल्या बँकेत टाकला.

दोन दिवसांनी त्याला बँकेकडून फोन आला आणि त्याला चेक बाऊन्स झाल्याबद्दल सांगण्यात आलं. चेकवरील स्वाक्षरी मिळतीजुळती नसल्याने चेक परत आल्याचं कारण सांगण्यात आलं आणि चेक परत आल्याने विद्यार्थ्याच्या खात्यातले पैसेही वजा झाले. हा चेक बाऊन्स झाल्याचं कळताच शिक्षण विभाग हडबडला आणि त्या विद्यार्थ्याला त्वरित दुसरा चेक देण्यात आला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी शिक्षण विभागाला काळजीपूर्वक काम करण्याचा सल्ला दिला आहे.