
>> संजय कऱ्हाडे
आजचा दिस अनुठा, द्वयात वाटीला! तासाभराच्या अंतराने खेळले जाणारे आजचे सामने. एक डोळा महिला विश्वचषकाचा अंतिम सामना पाहील आणि दुसरा डोळा बघेल ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी–ट्वेंटीचा! एक कान महिलांच्या कामगिरीकडे लागेल, तर दुसरा पुरुषांच्या सर्कशीची नोंद ठेवील! हृदय मात्र एकच असतं. ते जोकरांनी, सॉरी दोन विनोदवीरांनी निवडलेल्या संघाकडे किंचित दुर्लक्ष करू शकेल!
तसंही महिला विश्वचषक स्पर्धेचा सामना अधिक महत्त्वाचा आहे. सर्वांच्याच नजरा लागणार आहेत कप्तान हरमनप्रीत, उपकप्तान स्मृती आणि अर्थातच जेमिमाकडे! त्यांची बाकीची ऋचा, दीप्ती, अमनज्योत, क्रांती, रेणुका, चरणी, स्नेह (या राणाबद्दल कुणाला फारसा आक्षेप नाही!) इत्यादी पलटणसुद्धा अक्षता वाटायला तयार आहेतच. बघूया, प्रत्यक्ष सामन्यात त्या अक्षता वाटतात की दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या डोक्यावर मिऱया वाटतात!
जेमिमा आमच्या वांद्रय़ाच्या एम.आय.जी. क्लबची. छान हसरी आहे. खूप सराव, मेहनत करते. सगळीकडे सतत लक्ष असतं तिचं. कितीही कामात, बोलण्यात, व्यायामात गुंतलेली असली तरी स्वाक्षरी, सेल्फी मागणारा कधी नाराज होत नाही. उपांत्य फेरीच्या सामन्यात तर अख्ख्या
हिंदुस्थानला वेडं केलं तिने! जेमिमाची फलंदाजी ऑस्ट्रेलियासाठी मर्मभेदी ठरली. निराश होणाऱयांसाठी आशा पालवणारी ठरली. नकारात्मकांना सकारात्मक बनवणारी ठरली. आडातून मूठभर आकाश पाहणाऱ्यांना बाहेर काढून अथांग क्षितिज दाखवणारी ठरली. महिलांना घरात कोंडू पाहणाऱ्यांच्या नाकाला अमर्याद आसमंताची कस्तुरी लावणारी ठरली! म्हणूनच आज नजर लागी राजा हमरी जेमिमा पर!
तसंच कप्तानपदाला शोभणारी कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार आहे. निवड समितीची अध्यक्ष अमिता शर्मा आहे. अमिता देशासाठी खेळलीय. दोघांसमोरचं ध्येय एकच आहे, जिंकण्याचं! खेळायचं तेव्हा खेळले अन् आता खेळाची सेवा करताना दिसताहेत!
अमोलला मी ‘षटकार’, ‘स्पोर्ट्स स्टार’ ट्रॉफीच्या वेळेपासून जाणून आहे. धावा बॅटवर अन् स्मितहास्य चेहऱयावर! लहानपणीही शांत होता, आजच्यासारखाच! सचिन तेंडुलकरने पदार्पणाच्या रणजी सामन्यात नाबाद शतक (100 ) झळकवलं. त्यानंतर चार-पाच वर्षांनी अमोलने पदार्पणाच्याच रणजी सामन्यात द्विशतक (260 *) चमकवलं! तोपर्यंत सचिन-विनोद दोघांनीही वर्तमानपत्रांचे मथळे आपापल्या नावे लिहून टाकलेले होते! पण म्हणून मला माझ्या कामगिरीचं श्रेय कुणी दिलं नाही म्हणून तो कण्हत-पुंथत बसला नाही. अमोलने त्याच्या पहिल्या दर्जाच्या कारकीर्दीत तब्बल तीस शतपं आणि अकरा हजारांहून अधिक धावा केल्यात! कसोटीचा टिळा मात्र त्याला टाळूनच गेला! विश्वचषक जिंकण्यासाठी अमोल, हरमनप्रीत आणि संघाला शुभेच्छा!




























































