पाचगणीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, 5 लाखांचे कोकेन, 42.85 लाखांचा मुद्देमाल जप्त, 10 आरोपींना अटक

पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या पाचगणीमध्ये ड्रग्ज रॅकेटचा काळा चेहरा उघड झाला आहे. सातारा गुन्हे शाखा आणि पाचगणी पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या संयुक्त कारवाईत मुंबईतील 10 आरोपींना अटक करत 5 लाख रुपयांचे कोकेनसदृश अमली पदार्थ आणि 42 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे सातारा जिह्यात खळबळ उडाली असून, पर्यटनस्थळांनाही ड्रग्ज माफियांनी टार्गेट केल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वी जावळी तालुक्यात 115 कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता सातारा जिह्यात झालेली ही दुसरी कारवाई आहे. ड्रग्ज माफियांचे जाळे सातारा जिह्यात सक्रिय असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना घाटजाई मंदिर परिसरात कोकेन विक्रीसाठी आलेल्या संशयितांविषयी खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासोबत संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले. मंगळवारी मध्यरात्री पाचगणी येथील विस्टा ग्रॅण्ड सोसायटी, इस्टेला 1ए बंगला परिसरात सापळा रचण्यात आला. पार्ंकगमध्ये उभ्या असलेल्या स्कोडा रॅपीड (एमएच-02- डीएन-0259) आणि एम. जी. हेक्टर (एमएच-01-डीके -8802) या आलिशान वाहनांमधून 10 संशयित ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून कोकेनसदृश अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. चौकशीत हा ड्रग्जचा साठा पाचगणी शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

महंमद नावेद सलिम परमार (वय 32, रा. भेंडीबाजार, मुंबई), सोहेल हशद खान (वय 35, रा. पी.बी. मार्ग, मुंबई), महंमद ओएस रिजवान अन्सारी (वय 32, रा. नागपाडा, मुंबई), वासिल हमीद खान (वय 31, रा. नागपाडा, मुंबई), महंमद साहिल अन्सारी (वय 30 रा. मुंबई सेंट्रल), जिशान इरफान शेख (वय 31, रा. भायखळा, मुंबई), सैफ अली कुरेशी (वय 31, रा. मस्जिद गल्ली, मुंबई), महंमद उबेद सिद्दिकी (वय 27, रा. भेंडीबाजार, मुंबई), अली अजगर सादिक राजकोटवाला (वय 30, रा. नागपाडा, मुंबई) राहिद मुख्तार शेख (वय 31, रा. ग्रँट रोड, मुंबई). या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर करीत आहेत.