
केवळ नोकरीच्या मागे न लागता काळ्या आईची मनापासून सेवा केली तर हातात भरभरून दान पडते, याची प्रचीती वाड्यातील शेतकऱ्याने घेतली आहे. वाडा तालुक्यातील कळभोली गावात राहणारे किशोर वेखंडे यांनी एक एकरात सूर्यफुलाच्या एक किलो बिया रोवून ‘पिवळे सोने’ पिकवले आहे. पाण्याचे नियोजन, मेहनत आणि योग्य मशागत करून या शेतकऱ्याने अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
वाडा तालुक्यातील काळभोळी येथे राहणारे किशोर वेखंडे यांना शेतीची आवड आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून ते शेती करत आहेत. आतापर्यंत त्यांनी खरीप हंगामात भातशेती आणि रब्बी हंगामात हरभरा, वाल, तूर, मूग अशा कडधान्यांचे पीक घेतले आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच त्यांनी तेलबिया देणारे सूर्यफुलांच्या बिया रोवल्या. प्रत्येक बियांमध्ये पुरेसे अंतर ठेवले. योग्य मशागत, खते आणि पाण्याचे नियोजन केले. गेल्या महिन्याभरापूर्वी बिया रोवल्या असून आता रोपे येऊन त्यांना फुले लागली आहेत.
तरुणांनी शेतीकडे वळावे
सध्या नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी शेतीकडे अधिक लक्ष देऊन नवनवीन नगदी उत्पादन देणारी पिके घेतली तर नोकरी करून मिळणाऱ्या पगारापेक्षा शेतीत अधिक पैसे मिळवू शकतात असे किशोर वेखंडे यांनी सांगितले





























































