
सामना प्रतिनिधी । खेड
लाखो रुपयांचा शासकिय निधी खर्च करून खेड-भरणे मार्गावर बांधण्यात आलेली मोरी पहिल्याच पावसात खचल्याने मोरीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामाची सखोल चौकशी करून सदोष कामाबाबत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
खेड भरणे मार्गावरील कृषी कार्याजवळ असलेली मोरी धोकादायक झाल्याने मोरीची दुरुस्ती करण्याची मागणी भरणे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी केली होती. यासाठी उपोषणाचाही मार्ग अवलंबावा लागला होता. दरम्यान खेड भरणे रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. रस्ता रूंदीकरणादरम्यान मोरीचे काम केले जाईल अशी अपेक्षा ग्रामस्थांची होती. मात्र मोरीचे काम न झाल्याने ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला.
या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यानी मोरीच्या दुरुस्तीसाठी वेगळा प्रस्ताव करून शासनाला सादर केला. शासनाकडून आवश्यक तो निधी प्राप्त झाल्यावर वाहतूकीस धोकादायक झालेल्या मोरीची दूरुस्ती आणि रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पाऊस सुरू होण्यापूर्वी मोरीची दूरूस्ती आणि रूंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर प्रवास करणारे प्रवाशी आणि भरणे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र त्यांचे हे समाधान फार काळ टिकले नाही. पहिल्याच पावसात लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली मोरी खचली आणि मोरीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले हे स्पष्ट झाले.





























































