अजित पवार गटाच्या नागपूर पक्ष कार्यालयात रंगला लावणीचा कार्यक्रम

अजित पवार गटाच्या नागपूर येथील गणेश पेठ कार्यालयात लावणीचा कार्यक्रम रंगल्याचा प्रकार उजेडात आला आहे.  दिवाळी मिलननिमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात  वाजले की बारा या गाण्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी ठेका धरल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, याविषयी समाजमाध्यमांत उलटसुलट चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या नागपुरातील कार्यालयाचे दोन महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयात अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नृत्याचा कार्यक्रम येथे पार पडला. यामध्ये पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने आता वाजले की बारा आणि मला इश्काच्या झुल्यात झुलवा या दोन गाण्यांवर लावणी सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

व्हायरल व्हिडीओत काय?

राष्ट्रवादीची एक महिला कार्यकर्ती मला जाऊ द्या ना घरी वाजले की बाराया लावणीवर नृत्य सादर करत आहे. तिचे नृत्य पाहून उपस्थित दर्शक वन्स मोअरची मागणी करत आहेत. व्हिडीओत काही महिला कार्यकर्त्याही नृत्य सादर करणाऱ्या कार्यकर्तीला प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत.