
खासगी बसचालकाने अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. आरोपीने पीडित मुलीला रिलेशनशिपमध्ये राहू असे म्हणत तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी बसचालकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मार्च ते जून कालावधीत घडली. बसचालक सोमेश्वर घुले पाटील (वय 35, रा. वडाची वाडी, उंड्री) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पीडित मुलगी कोंढवा परिसरातील नामांकित शाळेत शिक्षण घेते. ती खासगी स्कूल बसमधून शाळेत ये-जा करते. त्यामुळे तिची संबंधित बस चालक सोमेश्वरसोबत ओळख झाली होती. आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिला आपण ‘रिलेशनशिप’मध्ये राहू, असे सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलीला रिलेशनशिप म्हणजे काय हे माहीत नसतानाही तिने होकार दिला.
अल्पवयीनपणाचा गैरफायदा घेत बसचालक सोमनाथने तिच्यावर तिच्याच दोन मैत्रिणींच्या घरी आणि पडीक इमारतीत अत्याचार केला. याप्रकरणी मुलीने पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार आरोपीला अटक केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे यांनी सांगितले.
बसचालकाच्या कृत्याने पालकांमध्ये घबराट
आरोपी सोमेश्वर गेल्या काही वर्षांपासून स्वतःची खासगी स्कूल बस चालवत आहे. तो या शाळेतील अनेक मुला-मुलींना ने-आण करण्याचे काम करतो. त्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोनानंतर दोन वर्षांनी शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यानंतर अशा घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

























































