बदलापूरच्या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यभरात या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीच्या फाशीची मागणी होत आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराविरोधात जनप्रक्षोभ उसळला असतानाही या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. नायगावमध्ये एका शाळेत दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेतील कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या 16 वर्षीय कर्मचाऱ्यानेच दुसरीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
अशी उघडकीस आली घटना?
बदलापूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर नायगाव येथील एका इंग्रजी शाळेत गुड टच आणि बॅड टचविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरानंतर सदर मुलीने आपल्या शिक्षिकेला आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. हँश वॉश, बाथरुमला जाताना आरोपीने 4 ते 5 वेळा मुलीचा विनयभंग केल्याचे मुलीने शिक्षिकेला सांगितले.
शिक्षिकेने तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापिकेला याबाबत माहिती दिली. मुख्याध्यापिकेने मुलीला बोलावून विश्वासात घेत विचारणा केली असता मुलीने घडला प्रकार सांगितला. यानंतर मुख्याध्यापिकेने नायगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. नायगाव पोलिसांनी 16 वर्षीय आरोपीविरोधात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. न्यायालयाच्या आदेशावरून अल्पवयीन आरोपीला रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे.