सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून गोडोली तळ्याचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. या तळ्यात येणाऱ्या ओढय़ावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच साताऱ्यातील हेरिटेज वास्तू परिसर ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. या ठिकाणी फ्लेक्सलाही बंदी करण्याचा निर्णय प्रशासकीय सभेत घेण्यात आला.
सातारा नगरपालिकेची प्रशासकीय सभा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेसमोर 290 विषय मंजुरीसाठी होते. सभेच्या सुरुवातीला मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी मागील सभेत चर्चा झालेल्या विषयांचा आढावा घेतला. त्यानंतर सभेला सुरुवात झाली. गोडोली तळ्याचे सुशोभीकरण करण्यात येत असून, या तळ्यात येऊन मिळणाऱ्या ओढय़ाचे दूषित पाणी तळ्यात मिसळू नये, यासाठी या ओढय़ावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एफएसटीपी प्लांट) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. सांबरवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे. पाणी वितरण व्यवस्था अत्याधुनिक करण्यात आली असून, त्याचप्रमाणे शहरातील स्ट्रीट लाईटसाठी डिजिटल मॉनेटरिंग ऍण्ड कंट्रोलिंग सिस्टिम ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. शहरात असलेल्या हेरिटेज वास्तू परिसरात ‘नो हॉकर्स झोन’ जाहीर करण्याचाही निर्णय सभेत घेण्यात आला. या परिसरात फ्लेक्स लावण्यासही मनाई करण्यात येणार आहे. दुबार झालेले दोन विषय रद्द करण्यात आले असून, 288 विषयांना मंजुरी देण्यात आली.
यावेळी नगर अभियंता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, दिग्विजय गाढवे, एनयूएलएमच्या गीतांजली यादव, विद्युत विभागाचे अभियंता अविनाश शिंदे, सीएफसीच्या अभियंता अस्मिता पाटील, नगररचना विभागाच्या सायली कदम, आरोग्य विभागप्रमुख प्रकाश राठोड, अतिक्रमण हटाव विभागप्रमुख प्रशांत निकम, अभियंता अनंत प्रभुणे, भांडार विभागाचे देविदास चक्हाण, सभासचिव अतुल दिसले, विश्वास गोसावी, कीर्ती साळुंखे, संतोष साखरे उपस्थित होते.