
लहान मुलांच्या बाबतीत थोडासा निष्काळजीपणाही किती महागात पडू शकतो याचा प्रत्यय गुरुग्राममधील घटनेवरून आला आहे. गुरुग्राममध्ये स्विमिंग पूलमध्ये खेळत असताना एका सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगा स्विमिंग पूलमध्ये बुडत असताना लाईफ गार्ड फोनवर बोलण्यात व्यस्त होता. लाईफ गार्डच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप मुलाचे पालक आणि सोसायटीवाल्यांनी केला आहे.
गुरुग्राममधील सेक्टर 37 डी मधील सिरीन सोसायटी या उच्चभ्रू इमारतीत ही घटना घडली. सहा वर्षांचा मिवांश लहान मुलांसाठी असलेल्या स्विमिंग पूलमध्ये खेळत होता. खेळता खेळता तो मोठ्या स्विमिंग पूलमध्ये गेला. मोठ्या स्विमिंग पूलमध्ये पडताच काहीच क्षणांत त्याचा बुडून मृत्यू झाला.
स्विमिंग पूलजवळ तैनात लाईफ गार्ड मात्र फोनवर व्यस्त असल्याने त्याचे मुलाकडे लक्षच गेले नाही. लाईफ गार्डच्या निष्काळजीपणामुळे सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी गुरुग्राम पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.