
जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत सेनेचा एक जवानही जखमी झाला आहे. कुपवाडा जिल्ह्यात लोलाब घाटीच्या त्रिमुखा टॉपवर काल रात्रीपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LOC) जंगलात दहशतवादी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सुरक्षा दलांनी त्यांना घेरले.
कोवूत, कुपवाडा येथे 23 जुलै रोजी दहशतवादी घुसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कुपवाडा पोलिसांनी लष्कराच्या 28 आणि 22 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांसह परिसराला वेढा घातला आणि संयुक्त शोध मोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पूंछ जिल्ह्यात 23 जुलै रोजी दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ कृष्णा घाटीत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. मात्र जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. मात्र यावेळी झालेल्या चकमकीत लान्स नायक सुभाष चंद्र यांना वीरमरण आले.