साखरेच्या गोडीला पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रसाद ताम्हणकर

जगभरात मधुमेह आणि लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे. या रोग्यांबरोबरच, विशेषत कोरोना काळापासून तब्येतीची जरा अधिक काळजी घेऊ लागलेले लोक साखरेसाठी उत्तम पर्याय शोधत आहेत. एक असा पर्याय जो साखरेसारखीच गोडी देईल आणि आरोग्यासाठीदेखील हितकारक असेल. सध्या जगभरातील अनेक स्टार्टअप कंपन्या असे पर्याय मोठय़ा खाद्य उत्पादक कंपन्यांना पुरवण्यासाठी धडपडत आहेत. हे पर्याय लवकरात लवकर अशा खाद्य उत्पादक कंपन्या आपल्या उत्पादनात वापरू लागतील यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.

सुमधुर अशा साखरेला नक्की पर्याय तरी काय आहेत? सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेल्या साखर अल्कोहोल, एरिथ्रिटॉल्सारखे पॉलिओल यांच्या जोडीला पॉलोज, अॅस्पार्टम आणि सॅकरिनचे कृत्रिम गोड पदार्थांचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत, जे विविध पेयांमध्ये वापरले जातात. वनस्पतींपासून प्राप्त होणारे स्टीव्हिया आणि मोंक फ्रूटसारखे गोड पदार्थदेखील वापरता येतात. मात्र यातील मोंक फ्रूटला अमेरिका आणि युरोपियन युनियनने अन्न पदार्थात वापरण्यास मनाई केली आहे. विशेष म्हणजे या कृत्रिम पदार्थांतील अर्थात स्वीटनर्समधील काही स्वीटनर्स हे साखरेपेक्षादेखील जास्त गोड असतात. त्यामुळे ते कमी प्रमाणात वापरावे लागतात.

हे पर्याय उपलब्ध असले तरी साखरेची सर्व वैशिष्टय़े यात उपलब्ध आहेत असे मात्र नाही. साखरेमुळे पदार्थाला एक रंग येतो, त्याला चविष्टपणा येतो. ते या पदार्थांनी होणे पूर्णपणे शक्य नसते. तसेच अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर हा ते पदार्थ अनेक दिवस टिकून राहण्यासाठीदेखील करण्यात येत असतो. सध्या या स्वीटनर्सचा बाजार 17 अरब डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे आणि येत्या दशकात तो 27 अरब डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे अनेक देशांतील बडय़ा गुंतवणूकदारांची नजर या बाजारपेठेवर खिळलेली आहे.

लोकांचा ओढा साखरेच्या पर्यायाकडे वाढत असला तरी या पर्यायांचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतो, याकडे आरोग्य तज्ञ लक्ष वेधत आहेत. मात्र यासंदर्भात पुरेसे संशोधन होणे गरजेचे आहे असे काही तज्ञांचे मत आहे. दुसरीकडे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कृत्रिम स्वीटनर्सचा वापर करणाऱया लोकांना जागतिक आरोग्य संस्थेने धोक्याचा इशारा दिलेला आहे. त्यांच्या वापराने मधुमेह आणि हृदयविकाराशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे. अस्पार्टेच्या वापराने कर्करोग होण्याची भीती खुद्द जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र याच जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱया संस्थेचे म्हणणे आहे की, जर ते मर्यादित प्रमाणात घेतले तर धोका नाही. एरिथ्रिटॉलचा संबंध हृदयविकाराच्या आजाराशी जोडण्यात आला आहे.

विविध प्रकारच्या चर्चा झडत असल्या तरी साखरेला पर्यायी उत्पादनांचा शोध अविरत सुरू आहे. सध्या चर्चेत असलेला पर्याय म्हणजे एल्युलोज. यात साखरेच्या तुलनेत 70 टक्के गोडपणा असतो आणि तुलनेने कॅलरीजदेखील खूप कमी असतात. याच्या वापराने शरीरातील साखरेच्या प्रमाणावरदेखील परिणाम होत नाही असा दावा करण्यात आला आहे. मात्र हे नैसर्गिकरीत्या फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. फळांच्या साखरेपासून तयार होणारे हे दुर्मिळ एल्युलोज मनुका आणि अंजिरामध्ये आढळते. उसापासून साखरेची निर्मिती करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी सध्या टॅगाटोज या वनस्पतीवर काम करते आहे. टॅगाटोज हा साखरेला सर्वोत्तम पर्याय ठरेल असा त्यांना विश्वास आहे. टॅगाटोज हा एल्युलोजपेक्षाही जास्त म्हणजे साखरेच्या तुलनेत 90 टक्के गोड आहे.

या सर्वांपेक्षा काहीसे वेगळे उत्पादन ब्रिटनमधील एक कंपनी विकसित करते आहे. हे उत्पादन कमी कॅलरीजचे आणि शरीरातील साखरेची पातळीदेखील कमी करणारे असेल. या उत्पादनाचे वैशिष्टय़ म्हणजे हे उरलेल्या कृषी उत्पादनांपासून जसे की, कापणीनंतर उरलेली मक्याची व इतर फळांची देठे, भुसा यांचा वापर करून बनवण्यात आले आहे. यासाठी बुरशीची मदत घेण्यात आलेली आहे. स्वस्त, पर्यावरणास हानी न पोहोचवणारे आणि कच्च्या मालाची मुबलक उपलब्धता असलेले उत्पादन म्हणून याकडे पाहिले जाते आहे.

साखरेचा पर्याय निवडायचा की साखर खाण्यावर नियंत्रण ठेवून तिचा गोडवा टिकवायचा हे आपल्या हातात आहे हे महत्त्वाचे!

[email protected]