नाशिकच्या शनिभक्तांवर राहुरीत काळाचा घाला, चार ठार, नऊ जखमी

शनीशिंगणापूर येथे शनिमहाराजांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या घोटी–इगतपुरी (नाशिक) येथील भाविकांवर राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात काळाने घाला घातला. भाविकांची रिक्षा आणि शिर्डीहून साईभक्तांना घेऊन येत असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील चार भाविक ठार झाले, तर टेम्पो ट्रॅव्हलरमधील नऊ भाविक जखमी झाले आहेत.

या अपघातात दीपक जगन डावखर, आकाश मनोहर डावखर, दीप विजय जाधव (सर्व रा. इगतपुरी) यांचा मृत्यू झाला आहे. तर रूपेश गणेश भगत (वय 19) आणि रोशन गंगाधर डावखर (रा. गिरणारे, ता. इगतपुरी) यांच्यासह इतर भाविक जखमी झाले आहेत.

राहुरी–शिंगणापूर रोडवरील उंबरे परिसरातील तांबे पेट्रोल पंपाजवळ सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. शनिशिंगणापूर येथून दर्शन घेऊन नाशिककडे निघालेल्या रिक्षा आणि शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरची उंबरे गावच्या हद्दीत समोरासमोर धडक झाली. या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला असून, रिक्षातील चारजण जागीच ठार झाले. टेम्पो ट्रॅव्हलर पलटी होऊन दूर फेकला गेल्याने त्यातील नऊ भाविक जखमी झाले. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. राहुरी येथील पाच रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना राहुरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिघांना मृत घोषित केले, तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या नऊ भाविकांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.