
एलिफंटा बेटावरील उत्खननात १५०० वर्षांचे जलाशय व इतर अनेक दुर्मिळ वस्तू सापडल्यानंतर आता आणखी दोन मोठ्या साठवणुकीच्या पुरातन भांड्यांचा शोध लागला आहे. पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने चार महिन्यांपासून एलिफंटा बेटावर ६० ते ७० कामगारांच्या मार्फत उत्खनन सुरू करण्यात आले आहे.
एलिफंटा बेटाच्या पूर्व बाजूला असलेल्या ‘मोरा बंदर’ परिसरात चार महिन्यांपासून उत्खननाचे काम सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वीच या उत्खननात शोध पथकाला एक १५०० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दुर्मिळ आयताकृती जल ाशय (टाके) आढळून आले आहे. त्याचबरोबर विविध प्रकारची धातूची नाणी, मृदू कुंभ आदी दुर्मिळ वस्तूंचा खजिना आढळून आला होता. यापाठोपाठ आता उत्खननात दोन मोठ्या साठवणुकीच्या भांड्यांचा शोध लागला आहे.
ज्यापैकी एकाची उंची सुमारे १.२५ मीटर आहे आणि दुसऱ्या तुटलेल्या भांड्याचा व्यास १.२२ मीटर आहे.
उत्खननात पुरातन भांड्यांशिवाय लोखंडाच्या विटा आणि एका दगडी नांगराव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात अँफोरा आणि टॉपेंडो जारचे तुकडे सापडले आहेत. याव्यतिरिक्त ८० मीटर अंतरावर एक विटांची पाण्याची टाकी आणि एक खडकात कोरलेली पाण्याची टाकी आहे. या टाक्या कापड रंगवण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जात होत्या. रंगवण्याच्या टाक्या म्हणून त्यांची ओळख आहे.
उत्खननाचा संबंध चौथ्या शतकाशी
एलिफंटा बेटावरील मोराबंदर येथील उत्खनन हे तेथील भव्य खडकात कोरलेल्या गुहांसाठी प्रसिद्ध आहे. उत्खननातून इसवी सन चौथ्या ते पाचव्या शतकापासूनच्या दूरच्या व्यापारावर प्रकाश पडला आहे. या उत्खननात एक महत्त्वपूर्ण जलाशयाचा शोध याआधीच लागला आहे. खडकाळ बेटावरील पाण्याची कमतरता हाताळण्यासाठी जलसंधारणातील अभियांत्रिकी कौशल्य यातून दिसून येते. उत्खननामुळे या स्थळाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व तसेच पाश्चात्य जगाशी असलेले संबंध स्पष्ट केले आहेत, अशी माहिती पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक, पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांनी सांगितले.



























































