
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत नगर जिल्ह्यामध्ये 1 लाख 65 हजार 550 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित करण्यात आले आहे. तर जिल्हा बँककडे कर्जमाफीचे 511 कोटी रुपये जमा झाले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची यादी नगर जिल्ह्यामध्ये जाहीर झाली. दोन लाख 52 हजार शेतकर्यांचा या यादीमध्ये समावेश होता. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादी प्रमाणित करण्याचे काम तात्काळ जिल्हा बँक सोसायट्या तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या मार्फत यंत्रणा सुरू करण्यात आली होती. सोमवारी आठ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित झालेले होते. मंगळवार सकाळपासूनच अनेक सोसायट्यांमध्ये तसेच बँकेमध्ये यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती.
नगर जिल्ह्यामध्ये दोन लाख 52 हजार शेतकऱ्यांपैकी 1 लाख 65 हजार 550 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांना बँकेमध्ये अथवा शाखेमध्ये येता येत नाही, अशांसाठी सरकारी यंत्रणा तसेच बँकेने संबंधित कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आधार प्रमाणित करण्याचे काम हाती घेतले आहे. दुसऱ्या यादीमध्ये आठ शेतकरी प्रमाणित करण्यात आलेले आहेत. त्यांच्या कर्ज खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत. राज्य शासनाने ज्या पद्धतीने आधार प्रमाणित होतील, त्या पद्धतीने तात्काळ पैसे बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याची व्यवस्था केली असून जिल्हा सहकारी बँकेकडे आत्तापर्यंत 511 कोटी 11 लाख रुपये जमा झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेमध्ये आधार प्रमाणित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून येत्या एक-दोन दिवसात आधार प्रमाणित पूर्णपणे होतील. ज्यांच्या काही तक्रारी आहेत त्यांना संबंधित समितीसमोर तक्रारी मांडण्याची मुभा देण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सांगितले. सर्व कामकाज सुलभ पद्धतीने व वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
























































