आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? आदित्य ठाकरे यांचा सवाल

नेरुळ पूर्व भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा पालिकेने उभारला आहे. या पुतळ्याचे काम गेल्या चार महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. तेव्हापासून हा पुतळा प्लॅस्टिकचा कादग आणि नेटमध्ये गुंडाळून ठेवला आहे. या पुतळ्याचे मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी अनावरण केले. त्यावेळी शिवसैनिक आणि मनसे सैनिकांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झटापट झाली. त्यानंतर अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? असा सवालही त्यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! ४ महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी, निवडणूक आयोग सरकारची!, असे आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पुतळ्याचे अमित ठाकरे यांनी अनावरण केले. पुतळ्याचे अनावरण होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी मोठी फिल्डिंग लावली होती. या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी पुतळा उभारण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अमित ठाकरे यांनी जलाभिषेक करून धुळीने माखलेला सर्व पुतळा धुऊन काढला आणि पुतळ्याचे अनावरण केले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.