हा कुठला न्याय? उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामीनावरून आदित्य ठाकरे यांचा संताप

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरला न्यायालयाने जामीन मंजूर करत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला देखील स्थगिती दिली आहे. त्याविरोधात या प्रकरणातील पीडितेने बुधवारी दिल्लीतील इंडिया गेटवर आंदोलन केलं मात्र अद्याप या प्रकरणी सरकारकडून कोणतिही प्रतिक्रीया आलेली नाही. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

”उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी, भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर याच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. शिवाय, बलात्काऱ्याविरोधात निषेध आंदोलन करणाऱ्या पीडितेला आणि तिच्या आईला पोलिसांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली ते धक्कादायक आहे. निवडणुकीसाठी भाजपने लाडकी बहिण योजना सुरू केली. पण दिल्लीत बलात्कार पीडितेसोबत जे घडले ते खरे सत्य आहे. संपूर्ण जग हे सर्व पाहतोय आणि यावर ते बोलतीलही. जे हिंदुस्थानात आंदोलन करतात त्यांची इथले नेते व मंत्री थट्टा करतात. आपण या इतक्या खालच्या स्तरावर उतरलो आहोत का? बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील दोषी ज्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी होती त्याला आपण जामीन देतो? हा कुठला न्याय आहे? हा कॉमन सेन्स आहे का ? ही माणूसकी आहे? जोपर्यंत दोषीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणीही याबद्दल बोलणे आणि निषेध करणे थांबवू शकत नाही! मी हे पाहिले आहे आणि याबद्दल बोलणार आहे”, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.