
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपची वोटचोरी उघड करणार असल्याचे सांगितले. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी मतचोरीचा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत. पारदर्शकपणे निवडणुका झाल्या तर त्यांना एक सीटही मिळणार नाही, त्यामुळे त्यांचे फुट पाडण्याचे राजकारण सुरू आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.
भाजप हिंदू-मुस्लीम राजकारण करण्याचा प्रयत्न करते, जिथे ते चालत नाही,त तिथे हिंदूमध्ये लावालावी करण्याचा प्रयत्न करते, जातीजाती राजकारण करण्यात येते, ते चालत नाही तिथे मराठीअमराठीचे राजकारण भाजपकडून करण्यात येते. कोणत्याही प्रकारे वोटचारी करून, निवडणुकांची सेटिंग लावून, स्वतःचीच माणसे निवडणूक आयोगात बसवून प्रत्येकाला 10-10 हजार रुपये वाटूनही आपण निवडणुका जिंकू असा विश्वास त्यांना नाही. ते पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे जिंकायला गेले तर त्यांना एक सीटही मिळणार नाही, त्यामुळे त्यांचे फुट पाडण्याचे राजकारण सुरू असते, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षांनी भाजपची वोटचेरी उघड केली आहे. बिहारमधील वोटचोरीही आता लवकरच उघड करण्यात येईल. हरयाणामधील वोटचोरी आम्ही उघड केली आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघातील वोटचेरी उघडकीस आणली आहे. आतापर्यंत निवडणुकीनंतर आम्ही ते उघड करत होतो. मात्र, आता प्रारुप मतदारयादीतील वोटचोरी आम्ही उघड केली आहे. लाखो नावे संभाव्य दुबार म्हणून नोंदवण्यात आली आहेत. एका घरात 10 पेक्षा जास्त मतदार दाखवले आहेत. अनेक ठिकाणी दुकानावर मतदार दाखवले आहेत. काही ठिकाणी सुलभ शौचालयातही मतदार नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे दुबार, तिबार आणि बोगस मतदार शोधण्याचे आमचे काम सुरू आहे. हे वोटचेरीचे प्रकरण आम्ही लावून धरणार आहोत. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणसाठी, मतदाराच्या हक्काच्या रक्षणासाठी आमची लढाई सुरुच राहणार आहे, असे ते म्हणाले.
पालघर साधी हत्याकांडातील प्रमुख आरोपी काशईनाथ चौधरी याला भाजपने पक्षात घेतले कसे? त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती का दिली? या प्रश्नाचे भाजपने उत्तर द्यावे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. याच मुद्द्यावरून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत होता. आता या हत्याकांडातील प्रमुख आरोपीलाच त्यांनी पक्षात घेतले आहे. जर ते प्रमुख आरोपी नसतील तर त्यांच्या प्रवेशाला स्थगिती का दिली? असा सवालही त्यांनी केला.
मत दिले तर फंड देणार, अशी दादागिरीची भाषा महाराष्ट्रात चालणार नाही. आपल्या देशात लोकशाही, संविधान आहे. तसेच न्यायदेवताही आहे, ही न्यायदेवता लवकरच न्याय करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


























































