शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा उद्या गुरुवारी वाढदिवस असून या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत आदित्य ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानी तमाम शिवसैनिक आणि युवासैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी शिवसैनिक आणि युवासैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक ‘मातोश्री’ निवासस्थानी येतात. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी विशेष आवाहन केले आहे. ‘मी आपणास वाढदिवशी मातोश्री निवासस्थानी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत भेटेन व आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करेन,’ असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. यंदाही रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीर, विद्यार्थी गुणगौरव, मोफत अन्नदान, रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा अशा उपक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले आहे.