
‘महायुतीमधील एका गटाचे 22 आमदार फुटणार’ असा बॉम्ब शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फोडल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता शिंदेंचे आमदार आमचेच असल्याचे विधान त्यांनी केले.
‘मित्रपक्षाचे आमदार आपल्या पक्षात घेण्याचे राजकारण आम्ही कधीही करत नाही. त्यात शिंदे सेनेचे आमदार भाजपात घेऊन काय करायचं? ते आमचेच आमदार आहेत’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची शिंदे सेना!
शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला भाजपने राजाश्रय दिला. केंद्राच्या इशाऱयावर चालणाऱ्या निवडणूक आयोगाने या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचा उल्लेख शिंदे सेना असा केला. एकदा नव्हे तर दोनवेळा मुख्यमंत्री आमचा मित्रपक्ष शिंदे सेना, असे म्हणाले.





























































