
महायुती सरकारमध्ये असलेल्या एका गटातील 22 आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती लागले असून, ते लवकरच फुटणार असा बॉम्ब आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी फोडला. त्यांचा इशारा एकनाथ शिंदे गटाकडे होता. यानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये चलबिचल सुरू असून नेमके कोण फुटणार याची चर्चा सुरू झाली आहे.
नागपूर येथे विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. कोणते आमदार फुटणार असे पत्रकारांनी विचारले असता, गेल्या काही महिन्यांत ज्यांना चांगला निधी मिळाला आहे असे हे आमदार आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे चार्टर्ड विमानाने जातात, इंडिगोने नाही अशा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. इंडिगोच्या घोळावरून दिशाभूल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केले का असा सवाल करताना, काल स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भाजपचे काही आमदार चार्टर्ड विमानाने नागपूरला आले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. विमान कंपन्या केंद्र सरकारचे ऐकत नाहीत. देशभरात विमान प्रवासाची वाट लागली आहे, पण हा गंभीर विषय मुख्यमंत्री टोलवत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱयांच्या आत्महत्या वाढल्या आहे. पर्यावरण नष्ट केले जातेय त्यावर चर्चा होत नाही. शेतकऱयांची कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना मदत यावर चर्चा होत नाही. सरकार अधिवेशनाबाबत गंभीर नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
विकासाच्या नावावर विनाश
कुंभमेळ्याच्या नावावर नाशिकच्या तपोवनातील हजारो झाडे तोडली जाणार आहेत. ठाण्यात मेन्टल हॉस्पिटलजवळ 700 झाडे तोडण्याची योजना आहे. बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील झाडे तोडली जाणार आहेत. नागपूरमधील अजनी वनही सरकार तोडायला निघाले आहे. देशात जिथे जिथे पर्यावरण वाचले आहे ते भाजप मारायला निघाले आहे, सरकार विकासाच्या नावावर विनाश करीत आहे, असा जोरदार हल्लाही आदित्य ठाकरे यांनी केला.
विरोधी पक्षनेता कधी होणार ते सांगा!
विरोधी पक्षनेते पदावरून सुरू असलेल्या चर्चेबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेता कोण होणार यापेक्षा तो कधी होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने राज्यात बहुमत असूनही सरकार विरोधी पक्षनेता का नेमत नाही, सरकारला नक्की कशाची भीती आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदासाठी दिलेले नाव बदलले ही केवळ अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका. ती बातमी कुणी पेरली हे आम्हाला माहीत आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
‘त्यात’ उद्योगधंदे करणारा स्वयंघोषित व्हाइस कॅप्टन!
हे 22 आमदार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इशाऱयावर नाचतात. ऊठ सांगितले की उठतात आणि बस सांगितले की बसतात, असा टोलाही त्यांनी लगावला. 22 आमदारांमध्ये जे स्वतःला व्हाइस कॅप्टन म्हणतात, ज्यांचे ‘उद्योग…धंदे’ चालतात त्यांचा समावेश असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.





























































