मुंबईत जे पाणी भरलं त्यासाठी पालकमंत्री जबाबदार नाही का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

सोमवारी मुंबईत पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं. यासाठी कंत्राटदार जबाबदार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्याचे पाण्याचे पंप वेळेत न लावल्याने या कंत्राटदारांवर 10 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. पण यासाठी मुंबईचे पालकमंत्री जबाबदार नाही का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे, नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच या लोकांना शहर चालवता येत नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, सरकार त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकतील पण त्या तीन पालक मंत्र्यांचे काय? पालिकेत कार्यालयासाठी पालकमंत्री घुसखोरी करतील, पण मुंबईत जे पाणी भरलं ती पालकमंत्र्यांची जबाबदारी नाही?

तसेच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काय? मान्सूनपूर्व झालेल्या बैठकांचे काय? ज्या रस्ते घोटाळे आम्ही उघड करतोय त्याचे काय? इतरांवर जबाबदारी ढकलने सोपे आहे. हे लोक जबाबदारीपासून पळ काढू शकतात हे सिद्ध झाले. हे नेते शहर चालवू शकत नाहीत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.