आम्हाला फक्त खुर्च्यांची चिंता असती, तर आम्ही भाजपसोबत गेलो असतो; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

ज्या ज्या शहरांवर किंवा राज्यांवर भाजप सत्तेत आली, तिथे उलट दिशेने प्रवास सुरू झाला आहे टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच आम्हाला फक्त खुर्च्यांची चिंता असती, तर आम्ही भाजपसोबत गेलो असतो घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.

पुण्यात आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, मी आज पुण्यात येताना पुन्हा एकदा जाणवलं की ही परिस्थिती आता केवळ स्क्रीनवर पाहण्यासारखी राहिलेली नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यावर अनुभवाला येते. आज येतानादेखील एवढा ट्रॅफिक लागला की मला कधीच मुंबई–पुणे एवढं अंतर इतकं मोठं वाटलं नव्हतं. पण हे का होतंय, कशामुळे होतंय, याच्या खोलात जाणं गरजेचं आहे.

गेल्या दोन-अडीच वर्षांत मी जेव्हा जेव्हा पुण्यात आलो, वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन असो, नागरिकांशी संवाद असो, वेताळ टेकडी असो, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो किंवा इतर विषय असोत, प्रत्येक वेळी एक गोष्ट ठळकपणे जाणवली. पूर्वी पुणे इतक्या सहज पाण्यात बुडायचं नाही, इतकं पाणी तुंबायचं नाही. पण आता पाणी तुंबतंय, पूरस्थिती निर्माण होतेय आणि ही परिस्थिती वाढत चालली आहे.

साधारण सात–आठ वर्षांपूर्वी असं वाटायचं की हे शहर प्रगतीसाठी, वाढीसाठी संधी असलेलं, एक ‘आस्पिरेशनल सिटी’ आहे. पण आता तेच शहर कुठेतरी चोक व्हायला लागलं आहे का, असा प्रश्न पडतो. आणि ही कोंडी केवळ लोकसंख्येमुळे नाही. लोकसंख्या वाढणं हे नैसर्गिक आहे, फ्लोटिंग पॉप्युलेशन असतंच. पण प्रशासकीय आणि शासकीय कामं जी व्हायला हवी होती, ती अनेक वर्षे प्रलंबित राहिली आहेत.

मी परवा एका प्रेझेंटेशनमध्ये मुद्दाम सांगितलं होतं की मला आपल्या देशात एक तरी असं शहर दाखवा जे भाजपशासित आहे आणि जे खरोखर सुधारलेलं आहे. ज्या ज्या शहरांवर किंवा राज्यांवर भाजप सत्तेत आली, तिथे उलट दिशेने प्रवास सुरू झाला. त्यांच्या जाहीरनाम्यात ते काय दाखवतात आणि प्रत्यक्ष जमिनीवर काय असतं, यामधली दरी इतकी मोठी असते की ती कुठल्याही ‘मिसिंग लिंक’ने भरून निघू शकत नाही.

याच कारणामुळे भाजप प्रत्येक निवडणुकीआधी स्वतः केलेली कामं दाखवू शकत नाही. कारण कामं केलेलीच नसतात. एकतर दुसऱ्यांनी केलेल्या कामांवर नाव बदलून फित कापली जाते, किंवा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जातीय दंगल, धार्मिक तेढ, समाजात फूट पाडणं. ‘डिव्हाइड अँड रूल’ हीच त्यांची राजकीय पॉलिसी आहे.

आता ही संधी आहे की आपण शहर सुधारण्यासाठी एकत्र आलो पाहिजे. पक्ष म्हणून नाही, तर नागरिक म्हणून. आमचं सरकार असताना देखील जिथे लोकांच्या भावना होत्या, तिथे आम्ही त्यांचा आदर केला. मी मंत्री असताना रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटबाबत नागरिकांकडून आलेल्या हरकती आम्ही तात्काळ सार्वजनिक केल्या आणि सत्य बाजू लोकांसमोर मांडली.

आज पुण्यात जगातलं कदाचित एकमेव उदाहरण आहे की नदीचं पात्र खोल करण्याऐवजी ते अरुंद केलं जातंय. जिथे रुंदीकरण व्हायला हवं, तिथे नदी छोटी केली जातेय. उद्या त्या नदीवर कव्हर घालून रस्ताही टाकतील. या रिव्हरफ्रंट प्रकल्पामुळे जवळपास 11 मंदिरे आणि चार महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली जाणार आहेत. जिथे आधी एसटीपीचं काम व्हायला हवं होतं, तिथे 550 कोटी, 950 कोटी, 1800 कोटी रुपये खर्च करूनही प्रकल्प बंद अवस्थेत आहेत.

वेताळ टेकडीचा प्रस्ताव तर अत्यंत भयानक आहे. वरून रस्ता, खालून बोगदा, बाजूने सपाटीकरण – कशासाठी? फक्त नावासाठी काहीतरी करून ठेवायचं आणि तो विनाश ‘विकास’ म्हणून दाखवायचा. मीच मंत्री असताना त्या प्रस्तावाला स्थगिती दिली होती.

आज कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. कुठे कुठली गँग, कुठे कुठली टोळी, ड्रग्सचा वाढता प्रश्न – हे सगळं धोक्याची घंटा आहे. ट्रॅफिक, कायदा-सुव्यवस्था याचा थेट परिणाम उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारावर होतो. हिंजवडीकडे जाताना 25 मिनिटांचं अंतर आज दीड-दोन तासांचं झालं आहे. हा धोका फक्त पुण्यासाठी नाही, तर राज्यासाठी आहे. त्यामुळे राज्यात खरंच सरकार आहे का, गृहमंत्री नेमके कोण आहेत, असा प्रश्न पडतो.

मी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो. जर आम्हाला फक्त सत्तेची, खुर्चीची किंवा सीट्सची चिंता असती, तर आम्ही केव्हाच भाजपसोबत गेलो असतो. त्यात काहीही अडचण नव्हती. सरकार कोण बनवणार, कोण खुर्चीवर बसणार, एवढाच जर प्रश्न असता, तर तो मार्ग आमच्यासाठी मोकळाच होता. पण आमच्यासाठी प्रश्न तो कधीच नव्हता.

आमचं राजकारण हे फक्त सत्ताकेंद्रित नाही, तर मूल्यांवर आधारित आहे. आमचं एक स्पष्ट धोरण आहे, आमचं एक व्हिजन आहे आणि काही गोष्टी आमच्यासाठी पूर्णपणे नॉन-निगोशिएबल आहेत. त्या गोष्टींवर आम्ही कधीही तडजोड करू शकत नाही, मग समोर सत्ता असो किंवा नसो.

पर्यावरणाचा प्रश्न असो, शहरांचा श्वास गुदमरवणारे प्रकल्प असोत, दर्जेदार रस्ते, फुटपाथ, मोकळी मैदानं असोत, किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असो — या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी मूलभूत आहेत. पुण्यात आणि इतर शहरांमध्ये चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास आम्ही कधीही स्वीकारू शकत नाही. हे बिल्डर किंवा कंत्राटदारांच्या फायद्यासाठी शहर उद्ध्वस्त करण्याचं राजकारण आम्हाला मान्य नाही.

म्हणूनच मी पुन्हा सांगतो, जर फक्त खुर्ची महत्त्वाची असती, तर आम्ही भाजपसोबत सहज जाऊ शकलो असतो. पण आम्हाला शहरांची, लोकांच्या जीवनमानाची, भविष्यातील पिढ्यांची काळजी आहे. आमच्यासाठी सत्ता हे साधन आहे, उद्दिष्ट नाही. आणि जेव्हा साधन आणि उद्दिष्ट यात संघर्ष होतो, तेव्हा आम्ही नेहमी उद्दिष्टालाच प्राधान्य देतो.

आज अनेक लोक वेगवेगळ्या कारणांनी, भीतीपोटी किंवा स्वतःला वाचवण्यासाठी भाजपकडे जात आहेत. ज्यांना भ्रष्टाचाराची भीती आहे, ज्यांना जेलची भीती आहे, जे काही लपवू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे असतील. पण जे लोक स्वच्छ मनाने, प्रामाणिकपणे, देशासाठी, राज्यासाठी, आपल्या मातीसाठी काम करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत.

2014 पूर्वी आम्ही स्वच्छ सरकार, पारदर्शक सरकार देण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्या काळात भ्रष्टाचाराविरोधात आमच्या कार्यकर्त्यांनी लाठीकाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. आज चित्र उलटं आहे. आज जे सगळे जगातले भ्रष्टाचारी आहेत, त्यांना एकत्र करून सत्ता टिकवण्याचं राजकारण चाललं आहे. हे आम्हाला मान्य नाही.

म्हणूनच आमचा निर्णय स्पष्ट आहे. आम्ही कुणासोबत जायचं की नाही, हे केवळ अंकगणितावर ठरणार नाही. ते शहराच्या हितावर, पर्यावरणावर, लोकांच्या सुरक्षिततेवर आणि लोकशाही मूल्यांवर ठरेल. आणि या सगळ्या बाबींवर तडजोड करून सत्ता मिळवण्यापेक्षा, सत्ता नसली तरी योग्य भूमिका घेणं आम्हाला अधिक महत्त्वाचं वाटतं.

महानगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदारांचा प्रश्न गंभीर आहे. मुंबई, पुणे, ठाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार आढळून आले आहेत. एका बाजूला सत्ताधाऱ्यांकडून बोगस मतदारांची निर्मिती सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला जात आहे; या दोन्ही गोष्टींमुळे महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे कलुषित होत चाललं आहे. क्लीन चीट मिळवणं सोपं झालं आहे, पण ती स्वीकारायची की नाही, हा अधिकार जनतेचा आहे आणि तो महानगरपालिका निवडणुकांत दिसेल.

पुण्याशी माझं वेगळं नातं आहे. याच शहरात माझ्या आजोबांचा जन्म झाला. पुणे बदलतंय, प्रगती होणं चांगली गोष्ट आहे, पण ट्रॅफिकची कोंडी, पर्यावरणाचा ऱ्हास आणि असुरक्षितता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या सगळ्या मुद्द्यांवर आधारित आमचा वचननामा योग्य वेळी जाहीर केला जाईल आणि पुणेकरच यावर अंतिम निर्णय देतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले.