परत कुणीतरी गावाला जाणार, आदित्य ठाकरे यांनी डिवचले

शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या नाराजीवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले. आज परत कुणीतरी गावी जाणार, असा टोला लगावत आदित्य ठाकरे यांनी खिल्ली उडवली.

आदित्य ठाकरे यांनी एक्सच्या माध्यमातून निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर!

पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणे म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवेफुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार? महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे, अशा तीव्र भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या.