50 खोक्यांमधला एक खोका शिरसाटांच्या व्हिडीओमध्ये दिसला, त्याची चौकशी होणार का? आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

आयटीची नोटीस येऊनही शिरसाट ऐटीत फिरत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच 50 खोक्यांमधला एक खोका शिरसाटांच्या व्हिडीओमध्ये दिसला, त्याची चौकशी होणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेली दोन अडीच वर्ष फक्त आम्हीच नाही तर 33 देशांनी ज्या गद्दारीची दखल घेतली ते 50 खोके एकदम ओके. त्यातला एक खोका कदाचित दिसला असेल. परवा एक आमदार मारामारी करताना बुक्की मारताना दिसला आणि एक आमदार खोकेसोबत दिसला. शिरसाट मंत्री असून त्यांच्यावर आरोप झाले आहेत. हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समितीही नेमली आहे. प्रश्न हाच आहे की गँगचे बॉस भ्रष्टनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करणार का? उत्तर नाही असे आहे. पण आयकर विभागाची जी नोटीस त्यांना आलेली आहे, ती उशिरा आलेली आहे. पण या आयटीच्या नोटीसीवर त्यांना क्लीन चिट मिळणार की भाजप कारवाई करणार हे पहावं लागणार असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच शिरसाट यांना आयटीची नोटीस आणि तरी आज ते ऐटीत फिरत आहे. काल कुणाला नोटीस आली, गुरुपौर्णिमेनिमित्त दिल्लीत गेलं आणि कोण भेटलं कोण नाही याची यादी आपल्या सर्वांकडे आहे. पण अतिशय निर्लज्जपणे कारभार सुरू आहे. खरोखरंच मुख्यमंत्र्यांना कारवाई करायची असेल तर हा व्हिडीओ पाहून ते काहीतरी पाऊल उचलतील ही एक आशा बाळगतो असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

संजय शिरसाट उलट चौकशी करतील, पण व्हिडीओत जे दिसतंय त्याची चौकशी कधी होणार? मिंधे गटातले आमदार बनियानची जाहिरात करत आहेत का?त्यांच्यावर अश्लीलतेची कारवाई झाली पाहिजे. पैसे त्यांचे होते ना? नोटबंदीनंतर नियम होता की दोन लाखांपर्यंत तुम्ही रक्कम ठेवू शकता. त्यात दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम होती की नाही? नोटबंदीनंतर झालेल्या कायद्यात शिरसाटांना सूट आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण ही विधानभवनाच्या हॉस्टेलमध्ये झाली होती. खरंतर अध्यक्षांनी यावर कारवाई करणे अपेक्षित होती. कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का? आमदारांच्या खाण्यात काही गडबड झाली तर असे ते मुक्केबाजी करू शकतो. तर उद्या रस्त्यांवर खड्डे आहेत, पूल पडत आहेत, ट्रेनचे अपघात होत आहेत, तर लोकांनाही अशी मुभा मिळणार आहे का? याचं उत्तर आम्हाला सरकारकडून मिळालं पाहिजे असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.