मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे लाडके गणपती बाप्पा मंडपाकडे जायला निघाले तरी बाप्पाच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न जैसे थेच आहे. शिवाय मुंबई-गोवा महामार्गाचीही स्थिती बिकट असल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग का रखडवला आणि भाजपने आश्वासने तरी का दिली, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
सर्वांचा लाडका गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गावी जात असतात. असे असताना मुंबई-गोवा महामार्गाच्या बिकट अवस्थेमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडणार आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबई-गोवा रस्त्याची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र दहा वर्षे उलटली तरी मुंबई-गोवा महामार्गाची स्थिती जैसे थेच असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
लिपिक पदासाठी अट शिथिल करा
पालिकेने जाहीर केलेल्या भरतीसाठी पहिल्या प्रयत्नात दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असण्याची अट घातली आहे. ही अट रद्द करावी अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. शिवाय या भरतीत संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू उमेदवारांना सहभागी करून घ्या, उमेदवारांना दोन भाषांव्यतिरिक्त फक्त एकच भाषा द्या, असेही ते म्हणाले.
शिवाय ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत एकाने 30 हजार भरून 78 हजार रुपये लुटल्याचे समोर आले आहे. त्यामुळेही राजवट भ्रष्टाचारी असल्याचे ते म्हणाले. जे सरकार छत्रपती शिवरायांचा पुतळा सुरक्षित ठेवू शकत नाही ते महाराष्ट्र सुरक्षित काय ठेवणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
पार्किंग हटवून भक्त निवास बांधा
मुंबादेवी परिसराच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मंदिराच्या मागे पार्किंग उभारण्याचे ठरवले आहे. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे या ठिकाणचे पार्किंग हटवा आणि भक्त निवास बांधा, असे आवाहनही त्यांनी केले.
पाणीपुरवठा, कचरा, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवा
आयुक्तांबाबत झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली. जी/दक्षिण वरळी विभागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. काही विभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच विभागातील डिलाइल पूल, स्मशानभूमीचे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. आपण उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार असून आपण काढलेल्या दौऱ्यामुळे मिंधे सरकारही दौऱ्याचे आयोजन करेल, असा टोलाही त्यांनी लगावला.