
गद्दार ते गद्दारच, रोज नुसती कारणं देत आहेत. त्यांच्या माथ्यावर लागलेला गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांना साथ देणाऱ्या मिंध्यांना लगावला.
फडणवीस यांना खोटय़ा प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच त्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी होती असे एकनाथ शिंदे यांनी दिली होती. याबाबत पत्रकारांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, शिंदे यांनी मागच्या सहा महिन्यांत गद्दारी करण्याचं हे बारावं कारण दिलं आहे. त्यामुळे आता काय बोलणार? पण एक लक्षात घ्या, जे गद्दार आहेत ते गद्दारच राहणार अशी टीका केली.
महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत विविध घोषणा झाल्या आहेत. विविध वचनं देण्यात आली, मात्र गद्दारांनी काहीही वचनं पूर्ण केली नाहीत. गद्दार जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. सभागृहात आम्ही जिथे बसायचे तिथेच बसलो होतो. गद्दार कुठे गेलेत ते त्यांनाच विचारा, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
अभिभाषणात राज्यपालांची दिशाभूल केली की काय?
राज्यपालांनी जे अभिभाषण केले त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील काम आणि निर्णय होते. त्यामुळे अभिभाषण ऐकूण असं वाटलं की राज्यपालांची दिशाभूल वगरे केली की काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. त्याबाबत आम्ही अधिक माहिती घेणार आहोत, अशी उपरोधीक टीका आदित्य ठाकरे यांनी केली.






























































