
वरळीतील डांबरी प्रकल्प व सेंच्युरी मिल वसाहतीच्या भूखंडांचा महापालिकेतर्फे लिलाव करण्यात येणार आहे. परंतु या भूखंडांचा लिलाव न करता या भूखंडावर निवृत्त पोलीस, महापालिका, शासकीय व बेस्ट कर्मचाऱ्यांसह गिरणी कामगारांसाठी कायमस्वरूपी घरे उभारावीत, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
महापालिका आयुक्तांना पाठवेल्या पत्रात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलेय, मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले हे दोन्ही भूखंड निवडून आलेल्या नगरसेवकांच्या अनुपस्थितित तसेच त्यांनी स्थापन केलेल्या समित्या अस्तित्वात नसताना, केवळ प्रशासकीय आदेशाच्या माध्यमातून लिलावाला काढणे हा लोकशाहीला मारक आणि भ्रष्ट कारभार आहे. त्यातही महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना, असा प्रकार घडणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. मुंबई संदर्भातले जे काही निर्णय आहेत ते मुंबईकरांनी व त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच घ्यायला हवेत, राज्य सरकारने नेमलेल्या प्रशासकांनी नव्हे! अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो मूळ उद्देश आहे, तोच इथे पायदळी तुडवला जातोय, अशी नाराजी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या हक्कांसाठी शिवसेना ठामपणे उभी
खासगी हक्कांविरोधात सेंच्युरी मिल वसाहतीच्या भूखंडावर पालिकेचा हक्क सिद्ध करण्यासाठी, जनतेची संमती न घेता, सार्वजनिक पैसा खर्च करून न्यायालयात लढा देण्यात आला आणि आता तो खटला महापालिकेने जिंकल्यानंतर, तोच भूखंड खासगी हातात लिलावाद्वारे देण्याचा निर्णय घेतला जात आहे. तेथे सध्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या हक्कांसाठी आम्ही ठामपणे उभे आहोत. तसेच प्रत्यक्ष त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांची संख्या आणि महापालिकेने दाखवलेली आकडेवारी यामध्ये मोठी तफावतसुद्धा दिसून येतेय, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.
…तर या भूखंडांवरील काम रोखू
डांबरी प्रकल्पाचा भूखंड असो किंवा सेंच्युरी मिल वसाहत…महापालिकेच्या या भ्रष्ट पद्धतीतून जो कुठलाही खासगी बांधकाम व्यावसायिक लिलाव जिंकेल, त्याला त्या ठिकाणी काम पुढे नेऊ दिले जाणार नाही, हिच आमची ठाम भूमिका आहे. हे दोन्ही भूखंड महापालिकेचे आणि पर्यायाने मुंबई शहराचे असल्याने, तेथे निवृत्त पोलीस कर्मचारी, महापालिका व शासकीय कर्मचारी तसेच बेस्टचे निवृत्त कर्मचारी यांच्यासाठी कायमस्वरूपी घरे उभारावीत. ही भूमिका या शहरासाठी व राज्यासाठी त्यांनी दिलेल्या सेवांच्या कृतज्ञतेचे प्रतीक ठरेल. गिरणी कामगारांनाही येथे घरे देण्यात यावीत, जेणेकरून खरे मुंबईकर शहरातच आपले घर मिळवू शकतील, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.






























































