ज्या सरकारने मराठी भाषा भवन आणि मराठी रंगभूमी दालनाला स्थगिती दिली, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? आदित्य ठाकरे यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोमांसाबाबत गोवा, ईशान्य भारत आणि इतर राज्यांत भाजपची भूमिका वेगळी का असते, हे स्पष्ट करावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच ज्या सरकारने मराठी भाषा भवन आणि मराठी रंगभूमी दालनाला स्थगिती दिली, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? असा
टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

विधीमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना मराठी भाषा भवन आणि मराठी रंगभूमीच्या दालनाचे काम पुन्हा सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली. त्यांनी सांगितले की 2021 साली या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले होते; मात्र त्यानंतर सत्तांतर झाल्यावर स्थगिती देण्यात आली. मिंधे सरकार आणि भाजपने हे काम थांबवले, असा आरोप त्यांनी केला.

मराठी भाषा भवनमध्ये विविध शासकीय खाती हलवण्याचा प्रस्ताव होता, त्यालाही त्यांनी विरोध केल्याचे सांगितले. मराठी रंगभूमीच्या दालनाचे काम स्थानिक आमदारांच्या भूमिकेमुळे थांबले असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित मलबार हिलच्या आमदारांना मराठीबाबत काही अडचण आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री यांनी हे काम पुन्हा सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

ज्या सरकारने मराठी भाषा भवन आणि मराठी रंगभूमी दालनाला स्थगिती दिली, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची, असा सवाल त्यांनी केला. भाषणे ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष काम केले असते तर आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन केले असते, असे ते म्हणाले.

शाळा बंद होण्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की संख्यापट, शाळांचा दर्जा आणि सरकारची भूमिका यावर हे अवलंबून असते. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब्स यांसारख्या सुविधा सुरू करण्यात आल्या. सव्वा लाख विद्यार्थी आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी मराठी अनिवार्य करण्यात आली. आयबी, आयजीसीएसई, सीबीएसई, आयसीएसई या अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. तसेच बेस्ट बस सेवा मोफत केली होती आणि शाळांमध्ये मराठी अनिवार्य केली होती, असे त्यांनी नमूद केले.

भाजपच्या एका मोठ्या देणगीदाराचा संबंध बीफ एक्सपोर्टशी असल्याचे वृत्त आल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि गोमांसाबाबत भाजपची भूमिका काय आहे, असा प्रश्न विचारला. गोवा, ईशान्य भारत आणि इतर राज्यांत भाजपची भूमिका वेगळी का असते, हे स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातही असे प्रकार होत असतील तर भाजप नेमके कोणासाठी आणि कशासाठी आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजपवर टीका करताना त्यांनी सांगितले की भाजप विविध संस्थांचा वापर राजकीय हेतूसाठी करत आहे. निवडणूक आयोग, ईडी, आयटी, सीबीआय या संस्थांचा वापर विरोधकांची बदनामी करण्यासाठी केला जातो, असा आरोप त्यांनी केला. न्यायालयांनीही काही बाबी लोकांसमोर आणल्या असल्याचे त्यांनी म्हटले.

अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोप आणि छाप्यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की जर आरोप खरे असते तर ते सिद्ध झाले असते. सत्यमेव जयतेचा विजय झाला असून केजरीवाल यांनी लढा दिला आणि जिंकले, असे म्हणत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

ममता बॅनर्जी यांचाही उल्लेख करत त्यांनी सांगितले की त्या देखील लढत आहेत. तामिळनाडूत ईडीची कारवाई सुरू असल्याच्या बातम्या आल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप ईडी, आयटी, सीबीआयचा वापर राजकीय स्वार्थासाठी करते आणि विरोधकांची बदनामी होते, असा आरोप त्यांनी केला. ज्यांच्यावर गंभीर आरोप असतात ते भाजपमध्ये जातात आणि मोठी पदे मिळवतात, असे ते म्हणाले. ज्यांनी आरोप केले त्यांनी जाहीर माफी मागावी; अन्यथा त्यांना कारावासात टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.